ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत अरूण टिकेकर यांचे निधन
मुंबई – ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत अरूण टिकेकर यांचे मंगळवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत लोकसत्ता या दैनिकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे कल्पक संपादक म्हणून सर्वसामान्य वाचकांना अरुण टिकेकर हे नाव माहित आहे पण याव्यतिरिक्त इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले अरुण टिकेकर यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे. एक अभ्यासू पत्रकार याप्रमाणेच ग्रंथप्रेमी अशी ओळख असलेल्या टिकेकर यांच्याकडे पंधरा ते वीस हजार पुस्तकांचा संग्रह होता. तरुण पत्रकार, राजकीय नेत्यांना त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले.
टिकेकर हे अतिशय चांगले मित्र आणि मार्गदर्शक होते. एखादी व्यक्ती छोटी असो वा मोठी, त्यांना जर ती व्यक्ती आवडली तर मग ते त्यांच्यांशी कायम संपर्कात असतं, ते संबंध जोपासत असत अशी भावना त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली.
टिकेकर यांचा ‘एकमत पुरस्कार’, तसेच ‘ अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला होता.