पुणे- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार जिल्हा निवडणूक कार्यालय व कमिन्स इंजिनियरिंग कॉलेज, कर्वे रोड,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिये संबंधी जनजागृती होण्यासाठी महिला मॅरेथॅानचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे 200 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाने विविध प्रकारच्या स्पर्धा, परिसंवाद, कार्यक्रम इत्यादींचे आयोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक कार्यालय,पुणे व कमिन्स इंजिनियरिंग कॉलेज,कर्वे रोड ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 3 मार्च रोजी सकाळी 7 वाजता महिला मॅरेथॅानचे आयोजन करण्यात आले होते. कमिन्स इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदविला. या मॅरेथॅान मध्ये पुण्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी, श्रीमती मोनिका सिंह सुद्धा धावल्या. या स्पर्धेत कमिन्स इंजिनियरिंग कॉलेजची शामली शेणोलीकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकवीला तर अपर्णा पै व रिया जाईल या विद्यार्थिनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आल्या.
या कार्यक्रमासाठी कमिन्स कॉलेजच्या संचालिका श्रीमती डॉ. माधुरी भुषण खाम्बेटे, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा सहायक आयुक्त,पुणे महानगरपालिकेचे ज्ञानेश्वर मोळक व त्यांचे अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.सलीम चाऊस यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहून वाहतूक व्यवस्थेचे संचलन केले, तसेच जिल्हा रुग्णालय, औंध हे रुग्णवाहिके सह उपस्थित राहिले. हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.