पुणे – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील सातारा ते देहूरोड दरम्यानची सहापदरीकरणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) आधिकाऱ्यांना दिला.
पावसाळयात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी आणि या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम गतीने व्हावे यासाठी श्री. राव यांनी ही बैठक बोलावली होती. बैठकीस अपर जिल्हाधिकारी प्रदीप पाटील, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, दत्तात्रय कवितके, स्नेहल बर्गे, मौसमी बर्डे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक पी. बी. दिवाण, व्यवस्थापक एम. एस. वाबळे, रिलायन्स कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राकेशकुमार कटारिया उपस्थित होते.
श्री. राव यांनी सांगितले, महामार्ग प्राधिकरणाने शासकीय जमिनीवरील महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. राष्ट्रीय महामर्गाच्या कामात दिरंगाई करणारा विभाग आणि संबंधितांना राष्ट्रीय महामार्ग कायद्यातील तरतुदीनुसार सूचना कराव्यात. महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी पोलीस संरक्षणाची आवश्यकता असल्यास संबंधित ठिकाणाचे नाव आणि कालावधी याबाबतचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाला सादर करावे.
राष्ट्रीय महामार्गावर पुणे शहरालगत नऱ्हे-आंबेगाव येथे मोठया प्रमाणावर नागरी वस्ती झाली आहे. येथे सेवा रस्ता करावा, अशी तेथील नागरिकांची मागणी आहे. मात्र तेथे स्माशनभूमी असल्यामुळे सेवा रस्ता करणे शक्य होत नाही. ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्माशानभूमीसाठी पर्यायी जागा देता येईल. त्यासाठी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेवून मार्ग काढला जाईल, असे श्री. राव यांनी सांगितले.
महामार्गालगतच्या गावांतील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी संबंधित गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, असे जिल्हाधिकारी राव यांनी सूचित केले.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण इत्यादी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरीकरण प्राधान्याने पुर्ण करा- जिल्हाधिकारी सौरभ राव
Date: