मराठी मतांना गुजराती भाषिकांच्या प्राबल्याविरोधात चेतवून भावनिक आवाहन करणाऱ्या शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी मराठी मतदार एकवटले, तरी भाजप केवळ गुजराती मतांवर विसंबून न राहता भाजपने उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, सिंधी, पंजाबी अशा सर्व स्तरातून मते मिळवल्याने मुंबईत भाजप हाच शिवसेनेपेक्षा काकणभर सरसच ठरला म्हणजेच मुंबईत शिवसेनेच्या वाट्याला आलेला मराठी टक्का कमी पडला हे स्पष्ट झाले आहे त्यामुळेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची तुलना कुतुबशाह आणि निजामशाह यांच्याबरोबर करणाऱ्या शिवसेनेला मुंबईत म्हणावे तितके यश मिळू शकले नाही.मुंबई, ठाणे या परिसरात समाजवादी पार्टी साफ होणे , राष्ट्रवादीचा सुपडा साफ होणे , रिपाइंलाही मतदारांनी मुंबईतून हद्दपार करणे , या गोष्टींचा अभ्यास होणे जरुरीचे आहे
मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यांमध्ये शिवसेनेला मोठा फायदा होईल, असे मतदानाला झुंडीच्या झुंडींनी उतरलेल्या मराठी मतदारांकडे पाहून वाटत होते. मात्र प्रत्यक्षात या मराठी मतांमधील मोठा वाटा शिवसेनेकडे गेला असला तरी त्यातही मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनीही थोडा का असेना त्यावर डल्ला मारल्याचे चित्र निकालांती स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शिवसेनेला दहिसरसारख्या अनेक मराठीबहुल जागांवर पाणी सोडावे लागले. दुसरीकडे भाजप, शिवसेना व मनसे अशा तीन पक्षांमध्ये काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन होत असल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला मिळेल, असा अनेकांचा कयास असताना काँग्रेसच्या हक्काच्या मुस्लिम व्होट बँकेवरच एमआयएमसारख्या पक्षाने डल्ला मारल्याने काँग्रेसची मुंबई शहरात दारूण अवस्था झाली. काँग्रेसच्या निवडून आलेल्या पाच जागांपैकी तीन मुस्लिम व एक दलित उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतील जनाधार हा मर्यादित असल्याचे अनेकदा स्पष्ट झालेच होते. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा या निवडणुकीत पार साफ झाल्याचेच चित्र समोर आले आहे.
मनसेचा शिवसेनेप्रमाणेच मुंबईत जोर असल्याचे त्या पक्षाच्या जन्मापासूनच स्पष्ट झाले होते. मात्र या निवडणुकीत गुजराती भाषिकांच्या विरोधात पेटून उठलेली मराठी मते पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिल्याने मनसेचा मुंबईत सुपडा साफ झाला असून राज ठाकरेंसाठी ही मोठीच धोक्याची घंटा आहे. मुंबईतील सर्वात धक्कादायक मिकाल हा भायखळा मतदारसंघात एमआयएमचा विजय हा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अतिरेकी मुस्लिम धर्मांधतेची भूमिका घेणाऱ्या ओवेसी बंधूंना मुंबई शहरात कधीही थारा मिळणार नाही, असे अनेकांना वाटत होते. मात्र लोकसभेत मुंबईतील सहाच्या सहा जागांवर सेना-भाजपच्या दणदणीत विजयाने हिंदू मते एकवटल्याची प्रतिक्रिया मुस्लिम वस्त्यांमधील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात उमटली होती. त्यामुळे भायखळा, मुंबादेवी, गोवंडी, कुर्ला आदी मुस्लिमबहुल वस्त्यांमधील मुस्लिम तरुणांमध्ये असदउद्दीन ओवेसी व अकबरउद्दीन ओवेसी यांच्या भाषणांच्या क्लिप्स व्हॉट्सअॅपवरून मोठ्या प्रमाणावर फिरत होत्या. स्वातंत्र्यानंतर भारतात काँग्रेसने मुस्लिम नेतृत्व जाणीवपूर्वक उभे राहू दिले नाही, असा तर्क देणाऱ्या या ओवेसी बंधुंवर मुस्लिम तरुण मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत होता. मात्र त्याकडे काँग्रेसने बेफिकीरातून दुर्लक्ष केले. त्यामुळेच भायखळा मतदारसंघात एमआयएमचे वारीस पठाण निवडून आले. शेजारच्याच मुंबादेवी मतदारसंघामध्ये अमिन पटेल यांना काँग्रेसची हक्काची हिंदू मते मिळाल्यानेच त्यांच्या पारड्यात विजयाचे दान पडले, अन्यथा अमिन पटेल यांचाही पराजय होऊ शकला असता.
समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांना विजय मिळाला असला तरी मुंबई, ठाणे या परिसरात समाजवादी पार्टी साफ झाली असून एकेकाळी त्यांच्या मागे फिरणारा मुस्लिम तरुण मोठ्या प्रमाणावर आता एमआयएमकडे गेल्याने त्यांनाही भविष्याच्या दृष्टीने रणनीती ठरवावी लागेल. रिपाइंचा मुंबईतील एकमेव उमेदवार दीपक निकाळजे यांना भाजपचा पाठिंबा असून व मोदींच्या स्टेजवर उपस्थित राहूनही मतदारांनी नाकारल्याने रिपाइंलाही मतदारांनी मुंबईतून हद्दपार केल्याचेच चित्र पुढे आले आहे.
‘एमआयएम’चा प्रवास
* हैदराबादचे नबाब मीर उस्मान अली खान यांच्या सूचनेवरून नबाब महमूद नवाझ खान किलेदार यांच्याकडून १९२७ मध्ये पक्षाची स्थापना.
* हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होऊ नये यासाठी दीड लाख रजाकार.
* १९४८ मध्ये एमआयएमवर बंदी आणि त्यांचे नेते कासीम रिझवी १९४८ ते १९५७ पर्यंत अटकेत.
* सुटकेनंतर अब्दुल वाहिद ओवैसी यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवून रिझवी यांचे पाकिस्तानात स्थलांतर.
अब्दुल वाहिद ओवैसी यांच्याकडून पक्षाची पुनर्बाधणी.
* १९६२ मध्ये पाथरघट्टी विधानसभा मतदारसंघात सुलतान सलाहुद्दीन ओवैसी यांच्या विजयाद्वारे एमआयएमचा आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश.
* १९८४ मध्ये हैदराबाद लोकसभा मतदारसंघात सुलतान ओवैसी यांची सरशी.
* यानंतर आजपर्यंत हा मतदारसंघ एमआयएमच्याच ताब्यात.
* एप्रिल २०१४ मध्ये तेलंगणा विधानसभेच्या ९ जागांवर एमआयएमचा विजय.
एमआयएमला निवडणूक आयोगाची मान्यता.
* २००७ मध्ये बांगलादेशची लेखिका तस्लिमा नसरीन यांच्यावर एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा हैदराबादमध्ये हल्ला.
मुंबईत मराठी टक्का कमी पडला … एमआयएमचा प्रवेश धक्कादायी
Date: