गिरीश वसईकर यांचे ‘मिस मॅच’ सिनेमातून सिनेदिग्दर्शनात पदार्पण!!
‘मिस मॅच’ १२ डिसेंबरपासून सिनेमागृहात!!
अभिनेता भूषण प्रधान आणि मॉडेल मृण्मयी कोलवालकर या फ्रेश जोडीचा ‘मिस मॅच’!!
सध्या मराठी सिनेमांमध्ये अनेक नवनवीन चेहरे पहायला मिळत आहेत. पूर्वीसारखे अमुक एक सिनेमात अमुक एक हिरोईन असली की सिनेमा चालतो हा प्रकार आता मोडीत निघाला आहे. ‘गोल्ड कॉईन एंन्टरटेण्मेंट’ च्या आलोक श्रीवास्तवा यांची निर्मिती असलेला आणि यु. के. फिल्म्सच्या रेहबर खान, अश्मित श्रीवास्तवा यांची प्रस्तुती असलेल्या ‘मिस मॅच’ सिनेमात ‘मृण्मयी कोलवालकर’ हा नवा चेहरा आपल्या भेटीस येणार आहे. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक आणि म्युझिक लॉंन्च सोहळा गायक, संगीतकार अवधूत गुप्ते आणि अभिनेते उदय टिकेकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी सिनेमातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.
‘गोल्ड कॉईन एंन्टरटेण्मेंट’ च्या आलोक श्रीवास्तवा यांची मराठीतील पहिली-वहिली निर्मिती असलेल्या ‘मिस मॅच’ सिनेमाचे दिग्दर्शन आजवर अनेक सिरिअल्ससाठी दिग्दर्शक म्हणून काम पाहणाऱ्या गिरीश वसईकर यांचे असून मराठी सिनेदिग्दर्शनातील त्यांचे हे पहिलेच पाऊल आहे.
हिंदी सिनेसृष्टीत मातब्बर मंडळींसोबत काम केल्यावर मराठी सिनेनिर्मितीतील माझा हा पहिलाच सिनेमा असून नवीन कलाकारांना ब्रेक देण्याचे मी ठरविले होते. यासाठी मी मॉडेल मृण्मयीची निवड केली. मृण्मयीने याआधी लॉरेल, गार्डन सारीज, दिनेश सुटिंगस यासाठी मॉडेल म्हणून काम केले असून ‘मिस मॅच’ हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. आजवर अनेक सिरिअल्ससाठी दिग्दर्शक म्हणून काम पाहणाऱ्या गिरीश वसईकर यांची दिग्दर्शकीय दृष्टी उत्तम असल्याने मी त्यांची निवड केली तसेच या सिनेमाचे गीतकार आणि संगीतकार यांनाही मी या सिनेमाच्या निमित्ताने ब्रेक दिला असून सिनेमाची गाणी उत्तम झाल्याचे निर्माते आलोक श्रीवास्तव यांनी नमूद केले.
या सिनेमातील यो यो… हे गाणे माझ्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. जेव्हा या गाण्याची ऑफर माझ्याकडे आली तेव्हा संगीतकार नवीन असल्याचे समजले. या संगीतकाराला माझ्या आवाजाची पट्टीची जाण आहे का, हे जाणून घेण्यासाठी मी या गाण्याचा ट्रॅक मागवून घेतला. जेव्हा तो ट्रॅक मी ऐकला तेव्हाच तो मला आवडला आणि मी लगेच होकार दिला. नवोदित संगीतकारांना ही संगीताची उत्तम जाण असल्याचे यावरून लक्षात आल्याचे गायक अवधूत गुप्ते यांनी सांगितले.
सुरुवातीला हा सिनेमा करताना थोडे दडपण माझ्यावर होते परंतु संपूर्ण टीमने मला उत्तम सहकार्य केले. दिग्दर्शक गिरीश वसईकर, माझा हिरो भूषण प्रधान, अभिनेते उदय टिकेकर यांनी वेळोवेळी दिलेल्या टिप्सचा मला खूप फायदा झाला यासाठी मी खरोखरच त्यांची आभारी असल्याचे मॉडेल, अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर हिने आवर्जून नमूद केले.
सिनेदिग्दर्शनातील माझे हे पाऊल असून निर्माते आलोक श्रीवास्तवा यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला संधी दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मृण्मयीला एखादी गोष्ट सांगितल्यावर ती त्याचे आकलन लगेच उत्तमप्रकारे करते. भूषण सोबत यापूर्वी काम केल्याने आमचे ट्यूनिंग चांगले आहे. डॉ. आशिष पानट यांनी लिहिलेली गाणी उत्तम असून नीरज यांनी त्या गीतांना सुमधुर संगीत दिले आहे. एकंदरीतच संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव छान असल्याचे दिग्दर्शक गिरीश वसईकर यांनी सांगितले.
‘मिस मॅच’ या सिनेमाच्या टायटल वरूनच आपल्याला हा सिनेमा प्रेम, लग्न या विषयावर भाष्य करणारा असल्याचे समजते. ही कथा आहे एका श्रीमंत घराण्यातील बिझनेसमनच्या मुलीची. आपल्या मुलीचे लग्न हे आपल्या पसंतीच्या तसेच श्रीमंत घराण्यातील अशा मुलाशी व्हावे अशी वडिलांची इच्छा असते. परंतु अरेंज मॅरेजवर आपला विश्वास नसल्याने आपण स्वतःच आपल्या पसंतीचा मुलगा शोधणार आणि त्याच्याशीच लग्न करणार असा हट्ट तिचा असतो. यासाठी ती मुलगी वडिलांकडून दोन वर्षाचा कालावधी घेते. या दोन वर्षात तिला तिच्या पसंतीचा नवरा मिळतो का ? की ती अरेंज मॅरेज करते? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘मिस मॅच’ हा सिनेमा पाहावा लागणार आहे.
सिनेमाची कथा-पटकथा- संवाद अशी तिहेरी भूमिका नितीन दिक्षीत यांची आहे. डॉ. आशिष पानट यांनी सिनेमातील गाणी लिहिली असून नीरज यांचे संगीत लाभले आहे. या सिनेमात चार वेगळ्या धाटणीची गाणी असून सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, बेला शेंडे, गायक हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते यांच्या सुमधुर आवाजात सिनेमातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. भरणी कानन यांनी सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून कोरिओग्राफर म्हणून गणेश आचार्य यांनी काम पाहिले आहे. अभिनेता भूषण प्रधान, मृण्मयी कोलवालकर यांच्यासोबत उदय टिकेकर, भाऊ कदम, जयवंत भालेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.
एकंदरीतच या ‘मिस’ ला तिचा परफेक्ट ‘मॅच’ मिळतो, की ‘मिस मॅच’ हे जाणून घेण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत थोडी वाट पहावी लागणार आहे.