पुणे :
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या ‘डायल 108’ रूग्णवाहिका सेवेद्वारे 26 जानेवारी 2014 ते 31 डिसेंबर 2014 पर्यंतच्या तपशीलानुसार 1 लाख 92 हजार 45 जणांना अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे.
‘108’ हा दूरध्वनी डायल केल्यानंतर ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’च्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात. ही सेवा 26 जानेवारी 2014 रोजी सुरू झाली होती. या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या संचालनाची जबाबदारी ‘बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड’ या सेवाक्षेत्रातील अग्रगण्य कंपनीकडे असून, पुण्यातील‘औंध उरो रुग्णालयात’ या सेवेचे प्रमुख केंद्र व ‘रिस्पॉन्स सेंटर’ आहे.
‘26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या सेवेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी 108 या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. अपघात, हृदय विकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते’, अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
दिनांक 31 डिसेंबर 2014 पर्यंतच्या तपशीलानुसार डिसेंबर महिन्यातील राज्यातील रूग्णांना दिलेल्या आपत्कालीन सेवेची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, अहमदनगर (1213), अकोला (407), अमरावती (772), औरंगाबाद (990), बीड (716), भंडारा (339), बुलढाणा (638), चंद्रपूर (614), धुळे (480), गडचिरोली (300), गोंदीया (364), हिंगोली (330), जळगांव (899), जालना (458), कोल्हापूर (902),लातूर (775), मुंबई (2257), नागपूर (944),नांदेड (1026), नंदूरबार (417), नाशिक (1191), उस्मानाबाद (499), परभणी (472), पुणे (1911), रायगड (389), रत्नागिरी (271), सांगली (827), सातारा (749), सिंधुदूर्ग (214), सोलापूर (1032), ठाणे (1572), वर्धा (178), वाशिम (339), यवतमाळ (784).
‘वेळेत उपचार न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाण्याचे प्रमाण मोठे आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाच्या आपत्कालीन वैद्यकिय सेवा प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘108 टोल फ्री’ रूग्णवाहिका सेवेला आठ महिन्याच्या कालावधीत या सुविधेमुळे लाखभराहून अधिक लोकांचे जीव वाचले. ’, अशी माहिती ‘बीव्हीजी इंडिया’चे अध्यक्ष एच. आर. गायकवाड यांनी दिली.
मुंबईकडे जाणारी एस.टी बस पांगोळी (खंडाळा) येथे महामार्गावरून दरीत कोसळल्याने झालेल्या अपघात स्थळी सेवेच्या 6 अद्ययावत रूग्णवाहिकांनी दहाव्या मिनिटाला घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. सोलापूरजवळील टेंभूर्णी येथे नुकत्याच झालेल्या अपघातामध्ये रुग्णवाहिका सेवेच्या 3 अद्ययावत रूग्णवाहिकांनी विसाव्या मिनिटाला घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करून प्राण वाचविले. गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवा रुग्णांपर्यंत अत्यंत कमी वेळेत पोहोचविण्यासाठी ‘डायल 108’ च्या रूग्णवाहिका डॉक्टर आणि सहाय्यकांसह उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यावेळी ‘इमर्जन्सी गो -टीम’ ही सेवा प्रथमच आप्तकालीन सेवेमध्ये राबविण्यात आली. ‘इर्मर्जन्सी गो -टीम’च्या आप्तकालीन कीटद्वारे रूग्णांपाशी जाऊन तातडीने मदत कार्य करण्यात आले. पोलीस, फायरब्रिगेड, गणेशमंडळ यांच्या सहकार्याने ही सेवा रूग्णांना चांगल्या प्रकारे आणि तातडीने देण्यात आली.
याआधी पुणे, सातारा, पंढरपूर या तीन जिल्ह्यांतून जाणार्या वारी मार्गावर या वर्षी प्रथमच 108 सेवेच्या आपत्कालीन रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. या सेवेमुळे वारीदरम्यान विविध कारणांनी दरवर्षी होणार्या साधारण 25 ते 30 वारकर्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊन यावर्षी हे प्रमाण सहापर्यंत खाली आणण्यात यश आले. तसेच भीमाशंकरजवळ माळीण गावात दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या (‘डायल 108’) 28 अद्ययावत रुग्णवाहिकांनी पूर्णवेळ मदतकार्य केले.