पुणे, : पिंपरी चिंचवडमधील स्मशानभूमीच्या परिसरात अनधिकृत वीजवापर करणार्या
नागरिकांना ‘महावितरण आपल्या दारी’ उपक्रमातून नवीन वीजजोडणी देण्यास आजपासून (दि. 25) प्रारंभ झाला.
आमदार श्री. गौतम चाबूकस्वार यांच्याहस्ते नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली.
भाटनगरजवळील स्मशानभूमीच्या परिसरात सुमारे 300 पत्राशेडची घरे आहेत. यापूर्वी या परिसरात
अनधिकृत विजेचा वापर होत होता. यात वीजहानी होत होती तसेच सुरक्षित वीजयंत्रणा नसल्याने परिसरातील
नागरिकांना धोका निर्माण झाला होता. महावितरणकडून नुकत्याच झालेल्या कारवाईत अनधिकृत वीजजोडण्या
काढून टाकण्यात आलेल्या आहेत. तथापि परिसरातील नागरिकांना सुरक्षित व अधिकृत वीजजोडणी देण्यासाठी
प्रयत्न सुरु झाले. ‘महावितरण आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे अधीक्षक अभियंता श्री. भालचंद्ग खंडाईत यांच्या
मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता श्री. धनंजय औंढेकर, उपकार्यकारी अभियंता श्री. अनिल बडवे, सहाय्यक
अभियंता सौ. शैलजा सानप यांनी परिसराची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर गेल्या
पंधरवड्यात 15 नवीन वीजखांब व एरियल बंच केबलच्या माध्यमातून वीज वितरणाची यंत्रणा उभारण्यात
आली. याकामी आमदार श्री. गौतम चाबूकस्वार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेही सहकार्य मिळाले.
नवीन वीजजोडणीचे ए-वन अर्ज दिल्यानंतर नियमानुसार 110 जणांना कोटेशन देण्यात आले. त्यातील
70 ग्राहकांनी कोटेशनची रक्कम भरली आहे. त्यांची वीजजोडणी कार्यान्वित करण्याच्या उपक्रमास आमदार श्री.
चाबूकस्वार यांच्याहस्ते आज प्रारंभ झाला. यावेळी नवीन वीजजोडणीच्या अर्जांचेही वाटप करण्यात आले. विजेचा
अनधिकृत वापर करण्याऐवजी ‘महावितरण आपल्या दारी’ उपक्रमातून अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन
यावेळी करण्यात आले.
कोटेशन भरलेल्या 70 जणांच्या घरात येत्या दोन दिवसांत वीजजोडणी कार्यान्वित होणार आहे तर उर्वरित
नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून कोटेशनची रक्कम भरल्यास त्यांनाही तात्काळ नवीन वीजजोडणी
देण्यात येणार आहे.