
केळेवाडी-रामबाग व काळेपडळ-महंमदवाडी या महापालिकेच्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान झाले होते. केळेवाडी-रामबाग या प्रभाग क्रमांक 26-‘ब‘मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत एकूण 42.33 टक्के मतदान झाले होते. या प्रभागात राष्ट्रवादीकडून दीपक मानकर, शिवसेनेकडून किशोर सोनार, भाजपाकडून दिलिप उंबरकर, कॉंग्रेसकडून हनुमंत राऊत, मनसेकडून गणेश शिंदे, तर दोन अपक्ष असे एकूण सात जण निवडणूक रिंगणात होते. विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागलेल्या मानकर यांनी या निवडणुकीत 3054 मतांनी विजय मिळविला. मानकर यांना 5610, उंबरकर यांना 2556 आणि राऊत यांना 856 मते मिळाली.
काळेपडळ-महंमदवाडी या प्रभाग क्र. 45 ‘अ‘ (काळेपडळ-महंमदवाडी)मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 48.04 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. येथेही राष्ट्रवादीकडून फारुख इनामदार, शिवसेनेकडून जयसिंग भानगिरे, भाजपाकडून जीवन जाधव, कॉंग्रेसकडून वैभव डांगमाळी, तर संजय घुले यांच्यात प्रमुख लढत होती. राष्ट्रवादीच्या इनामदार यांनी 2387 मतांनी विजय मिळविला.