‘मानसन्मान’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत मनाचे स्थान मिळविणारे दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे एकानंतर एक असे सलग तीन चित्रपट पुढील काही महिन्यात प्रदर्शित होत आहेत. प्रवीण कारळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘दुनिया गेली तेल लावत’ हा चित्रपट ऑक्टोंबर महिन्यात, ‘माझी आशिकी’ हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात तर ‘हा, मी मराठा’ हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे या तिन्ही चित्रपटांचे कथाविषय अतिशय वेगवेगळे आहेत.
वयाच्या अगदी चौथ्या वर्षापासून रंगभूमीवर पदार्पण केल्यामुळे नाट्य आणि चित्रसृष्टीच्या सर्व विषयाची बारीक-सारीक माहिती असलेले प्रवीण कारळे हे सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे चिरंजीव असून एक हरहुन्नरी दिग्दर्शक म्हणून त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीत नाव आहे. बालनाटकांपासून मोठ्या नाटकांपर्यंत आणि लघुपटापासून विविध मालिका आणि चित्रपटांचे प्रवीण कारळे यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘मानसन्मान’ या आपल्या पहिल्याच चित्रपटात त्यांनी शिवाजी साटम, रिमा लागू यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसमवेत त्यांनी काम केले. त्यानंतरचे त्यांचे ‘बोकड’ आणि ‘भैरू पैलवान की जय’ हे चित्रपटही गाजले. आणि आता त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘दुनिया गेली तेल लावत’, ‘माझी आशिकी’ आणि ‘हा, मी मराठा’ हे तीन एकापाठोपाठ प्रदर्शित होत आहेत.
‘दुनिया गेली तेल लावत’ या चित्रपटात खरे बोलणाऱ्या तरुणाची कथा असून त्याच्या खरे बोलण्यामुळे सगळेजण कसे अडचणीत येतात. याचे खुमासदार चित्रण करण्यात आले आहे. सिद्धार्थ जाधव, नवतारका मानसी देशमुख, डॉ. गिरीश ओक आदी प्रमुख कलाकार असलेला हा चित्रपट ‘रहस्यमय कॉमेडी’ आहे. अनिल कालेलकर यांच्या कथेवर बेतलेल्या या चित्रपटाचे निर्माते प्रीतम देव असून हा चित्रपट दोन ऑक्टोंबरला प्रदर्शित होत आहे. ‘माझी आशिकी’ हा त्यांचा दुसरा चित्रपट सहा नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत असून ती खूप वेगळी ‘प्रेमकहाणी’ आहे. निर्मात्या सरिता चिल्की यांच्या या चित्रपटाची कथा सुरेश वाल्मिकी यांनी लिहिली आहे. आनंद माने आणि इस्टर नोरोला ही फ्रेश जोडी या चित्रपटाद्वारे मराठीच्या पडद्यावर पदार्पण करीत असून इस्टर नोरोला हिने यापूर्वी अनेक दाक्षिणात्य चित्रपटात कामे केली आहेत.
त्यांच्याशिवाय उदय टिकेकर, डॉ. गिरीश ओक, भाऊ कदम यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. तरुणाईला साद घालणारा आणि ‘साहसपट’ ठरेल असा ‘हा, मी मराठा’ हा प्रवीण कारळे यांनी दिग्दर्शित केलेला तिसरा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. निर्मात्या अमृता राव यांच्या या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, प्रियांका यादव, यतीन कार्येकर यांच्या प्रमुख भूमिका असून अनिकेत विश्वासराव यांची तगडी भूमिका हे या चित्रपटाचे खास वैशिष्ठ्य आहे. याशिवाय प्रसिद्ध निर्माते सुधाकर बोकाडे यांच्या ‘हैण्डस-अप’ या हिंदीतील रहस्यपटाचेही प्रवीण कारळे यांनी दिग्दर्शन केले असून तो पुढील वर्षी जानेवारीत प्रदर्शित होत आहे.