नवी दिल्ली – तीन महिन्यात पेट्रोल डीझेल दहा रुपयांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचे कारण देऊन केंद्र सरकारने एका पंधरवड्यात पेट्रोल व डिझेलच्या दरांत दुसऱ्यांदा मोठी वाढ केली आहे. नव्या दरांप्रमाणे पेट्रोल लिटरमागे 3 रुपये 13 पैशांनी, तर डिझेल 2.17 रुपयांनी कडाडले आहे. यामुळे दिल्लीत पेट्रोल लिटरमागे 63.16 वरून 66.29 रुपये लिटरवर झेपावेल, तर डिझेल 49.57 रुपयांवरून सुमारे 53 रुपयांपर्यंत जाईल. दिल्ली आणि पुण्यातील दारात चक्क १० रुपयांची तफावत असणार आहे म्हणजे पुण्यापेक्षा दिल्लीत सुमारे १० रुपयांनी पेट्रोल डीझेल स्वस्त असणार आहे… वर्षभरात खरोखर किती महागाई कमी झाली ? किती देश मोदी फिरले ?मोबाईल आणि इंटरनेट सेवेत खर्च कसा वाढला? याबाबत आता जनतेनेच आत्मचिंतन केलेले बरे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा येत्या 26 मे रोजी पहिला वर्धापन दिन सोहळा होईल त्या गाजावाजात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती एखाद-दीड रुपयाने कमी करून देशवासीयांना जणू गोड भेट दिल्याची जाहिरात करण्याचे सरकारचे नियोजन असल्याने आजची दरवाढ लादण्यात आल्याचे समजते. गेल्या एक मे रोजी पेट्रोलचे दर 3.96 रुपयांनी व डिझेल 2.37 रुपयांनी कडाडले होते. देशांतर्गत पेट्रोल दरप्रक्रिया निर्बंधमुक्त केल्यावर “इंडियन ऑइल‘ व “भारत पेट्रोलियम‘सह चारही पेट्रोलियम उद्योगांतर्फे साधारणतः दर पंधरवड्याने दरांचा आढावा घेतला जातो. मात्र सरकारने एक दिवसापासून 12 ते 14 दिवसांतच पेट्रोलियमच्या दरांत चढ-उतार करण्याचे धोरण ठेवल्याचे गेल्या वर्षभराच्या वाटचालीवरून दिसत आहे. यापूर्वी सरकारने ऑगस्ट 2014 ते फेब्रुवारी 15 या काळात दहा वेळा केलेल्या एकूण पेट्रोल दरकपातीत लिटरमागे 17 रुपयांनी भाव घटले होते. मात्र तेलकंपन्यांनी गेल्या दोन महिन्यांत यातील सुमारे निम्मी तफावत दोन-तीन झटक्यांत भरून काढल्याचे दिसते. एक मार्चपासून पेट्रोल दरवाढीचे दणक्यावर दणके बसण्यास सुरवात झाली.