हिंसाचार प्रकरणी पोलिसांच्या विरोधात एफआयआर दाखल करणार जामिया विद्यापीठ
नवी दिल्ली – जामिया विद्यापीठात हिंसाचार प्रकरणी पोलिसांविरोधातच एफआयआर दाखल केली जाणार आहे. जामिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिल्ली पोलिस जामिया विद्यापीठात परवानगी न घेताच घुसले होते. यानंतर त्यांनी विद्यापीठ परिसरात तोडफोड केली. एवढेच नव्हे, तर विद्यापीठाच्या लायब्रेरीमध्ये अभ्यास करत बसलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करत तेथे सुद्धा तोडफोड केली. या घटनांमध्ये जवळपास 200 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जामिया विद्यापीठात रविवारी रात्री 4 बससह 8 गाड्या जाळण्यात आल्या. त्यामध्ये पोलिस सुद्धा तोडफोड करत असल्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये पोलिसांनी 52 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. तत्पूर्वी जामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.
कुलगुरूंनी सांगितले, त्या रात्री नेमके काय घडले..?
कुलगुरू पुढे म्हणाल्या, “शुक्रवारी पहिल्यांदाच जामिया विद्यापीठात मार्च काढण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांसह प्राध्यापक सुद्धा सहभागी झाले होते. बाहेरून येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी पोलिसांनी मुख्य प्रवेश द्वारावर बॅरिकेड्स लावले होते. आम्ही त्यांना बॅरिकेट्स लावू नका असे आवाहन केले होते. तरीही काही लोक कॅम्पसमध्ये घुसले आणि त्यांचा पाठलाग करताना पोलिस सुद्धा कॅम्पसमध्ये घुसले. आम्ही सगळे आत बसलो होतो. पोलिस आल्यास त्यांची मदत करू असे आम्ही ठरवले होते. पण, पोलिसांनी कॅम्पसमध्ये घुसताच सर्वांवर लाठीमार सुरू केला. पोलिसांनी मला विचारायला हवे होते. विद्यापीठ प्रशासनाला विचारायला हवे होते. आमचे विद्यार्थी लायब्रेरीमध्ये बसले होते. पोलिस त्या ठिकाणी सुद्धा पोहोचले आणि लाठीमार केला. मुला-मुलींना अतिशय क्रूरपणे मारहाण करत धमकावण्यात आले. हे मुळीच योग्य नाही. यात विद्यापीठाचे मोठे नुकसान झाले आहे.