‘चेहरे’ या आगामी हिंदी चित्रपटात ‘सायको थ्रीलर’ चे विलक्षण नाट्य प्रेक्षकांना पाहायला मिळेल असे या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक रोहित कौशिक यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावणारी अभिनेत्री हर्षिता भट्ट तसेच अभिनेत्री गीता विज उपस्थित होत्या.
जैकी श्रॉफ. मनीषा कोईराला, गुलशन ग्रोव्हर, दिव्या दत्ता, राकेश बेदी, हर्षिता भट्ट, आर्य बब्बर अशी तगडी स्टारकास्ट असणारा ‘चेहरे’ हा चित्रपट येत्या २८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक रोहित कौशिक म्हणाले की, ‘सायको थ्रीलर असलेल्या या चित्रपटाची कथाच अशी विलक्षण आहे की, हा चित्रपट साथ टक्के रंगीत तर चाळीस टक्के कृष्णधवल आहे. मुकपटाच्या जमान्यात काम करणाऱ्या ‘तराना’ नावाच्या एका प्रसिध्द अभिनेत्रीची ही विलक्षण कथा आहे. मुकपटाच्या जमान्यात काम करणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला त्यानंतरच्या बोलपटाच्या जमान्यात हवे तसे ‘स्थान’ मिळत नाही त्यामुळे तिच्या होणाऱ्या मानसिक घुसमटीची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक नाट्यपूर्ण प्रश्नांची मालिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कथेचा प्रारंभ १९५२ साली इंग्लंडमध्ये घडलेल्या एका घटनेने होतो. फ़्लैशबैक तंत्राचा वापर करून सादरीकरण केलेल्या या कथेत १९३० ते १९४० या दशकाचेही चित्रीकरण करण्यात आले असून ते पूर्ण कृष्णधवल स्वरुपात पाहायला मिळणार आहे असेही त्यांनी सांगितले.
आपले जीवन जगताना माणसाला अनेकदा खोट्या मुखवट्याचा आधार घ्यावा लागतो. या प्रत्येक मुखवट्यामागे एक कथा असू शकते म्हणूनच माणसांचे हे ‘चेहरे’ तपासण्याची गरज असते. अशाच चेहऱ्यांची या चित्रपटात कहाणी आहे असे सांगून रोहित कौशिक पुढे म्हणाले, या चित्रपटात जुन्या काळाचे चित्रीकरण असले तरी प्रेक्षकांना अजूनही गतकाळाचे वैभव पाहायला आवडते. त्यामुळेच नव्या वातावरणातही जुने काळ दर्शविणारे चित्रपट चालू शकतात असे ते म्हणाले.
या चित्रपटात आपली अतिशय वेगळी भूमिका असून ती आव्हानात्मक आहे असे सांगून हर्षिता भट्ट म्हणाली की, माझ्या व्यक्तिरेखेचे लेखनच इतके परफेक्ट होते की मला त्या भूमिकेचा अभ्यास करण्याची फारशी गरज पडली नाही. अभिनेत्री गीता विज हिने आर्य बब्बरच्या प्रेमिकेची भूमिका असून या चित्रपटातील माझा अनुभव खूपच चांगला होता असे तिने सांगितले. जैकी श्रॉफ यांनी या चित्रपटात एका निर्माता-दिग्दर्शकाची भूमिका केली असून गुलशन ग्रोव्हर डॉक्टरांच्या भूमिकेत चमकले आहेत. तर ‘तराना’ ची मध्यवर्ती भूमिका मनीषा कोईराला हिने केली आहे. या चित्रपटात चार गाणी असून ती संगीतकार जयदीप चौधरी यांनी स्वरबद्ध केली आहेत. कथेला अनुकूल अशा जुन्या साजातील ही गाणी श्रवणीय आहेत.