(सिनेसामिक्षण -सोबत पहा ट्रेलर )
दर्जा -४/५
कलाकार-गश्मिर महाजनी, कश्मिरा कुलकर्णी, देविका दफ्तरदार, अरूण नलावडे
दिग्दर्शक-संजय लोंढे
निर्माते – नंदा चंद्रभान ठाकूर आणि शशिकला क्षीरसागर
एक्शन हिरो – स्मार्ट -देखणा -तगडा मस्त नाचणारा हिरो जसा हिंदीत असतो तसाच नायक यापुढे मराठीत ही हवाच ; जोश -जल्लोषमय -वेगवान गाणी हवीत तडाखेबाज संगीत हवे , दणदणीत डबिंग आणि थोडेसे तरी वास्तवतेला विसरून स्वप्न रंजनी -मनमोहिनी असा सिनेमा हवा, असा नवा नवा ट्रेंड जो ‘लय भारी ‘ ने आणला आता ‘कॅरी ऑन मराठा’ ने आणखी पुढे कॅरी तर केलाच पण गश्मीर सारखा सर्व नायकांना त्यांच्यातील स्पर्धेला आव्हान देणारा नायक ही दिला हे पाहता या पुढे मराठी सिनेमाचा ट्रेंड आता साऊथ आणि हिंदीप्रमाणे बदलू लागेल असे वाटू लागले तर नवल नाही .
नंदा आर्ट्स आणि वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्स यांची निर्मिती असलेला ‘कॅरी ऑन मराठा’ हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालाय. ह्या चित्रपटातून अभिनेते रविंद्र महाजनींचा मुलगा गश्मीर महाजनीचे जोरदार लोन्चिंग निर्माते नंदा चंद्रभान ठाकूर आणि शशिकला क्षीरसागर यांनी केले आहे असे म्हटले तर वावगे होवू नये तर दिग्दर्शक संजय लोंढे यांची सूध्दा ही पहिली मराठी फिल्म आहे.
महाराष्ट्र-कर्नाटकामध्ये सीमावादावरून नेहमीच वादळं उठतं आलीत. अनेकदा दंगेही झालेले आपण गेल्या काही वर्षांत पहिलंय. ह्याच विषयाची पार्श्वभूमी ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमाला लाभली आहे. कोल्हापूरातला मार्तंड, कर्नाटकातल्या कुसूमला भेटतो. योगायोगाने झालेली ह्या भेटीचं रूपांतर, प्रेमात होते. आणि मग मराठी विरूध्द कन्नडी हा दोघांच्या घरातला व्देष आपल्यासमोर येतो.
चित्रपटाची कथा अशी, तशी, कधी भरकटली असली तरी मध्यन्तरापर्यन्तच ती प्रेक्षकांच्या हृदयावर स्वार होते . उत्तरार्धात तर चित्रपटात बरेच नाट्य घडते. पण ते सगळे नाट्य दाखवण्याच्या नादात प्रेक्षकांना नाहक बुचकळ्यात टाकल्यासारखे झाले आहे . कथा दमदार नसली -तरी संगीत आणि अन्य बाबी हि सिनेमाला लोकप्रियतेच्या शिखरावर नेवू शकतात हे अलीकडे ‘बाहुबली’ ने दाखविले आहेच .
सिनेमाचं संगीत छानच आहे. शैल-प्रीतेश यांनी सिनेमाचं संगीत दिलंय. मार्तंड मल्हार, सोबाने सोयनिरे, जगळगंत ही गाणी ठेकेबाज , श्रवणीय आहेत. गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, मंगेश कांगणे, हृदया शिवा यांनी लिहीलेली गाणी आणि श्रेया घोषाल, आदर्श शिंदे, वैशाली भेसने-माडे, शैल हाडा, उर्मिला धनगर यांनी त्या गाण्यांना आपल्या स्वरांचा साज चढवल्याने बहार आलीय.
कश्मिरा कुलकर्णी, देविका दफ्तरदार, उषा नाईक, शंतनू मोघे, समीर खाडेकर, ओमकार कुलकर्णी, अरुण नलावडे, अमेय कुंभार आणि सचिन देशपांडे यांच्यासोबतच अमीन हाजी, करीम हाजी, किशोरी बल्लाळ असे कलाकार या चित्रपटात आहेत. अमेय कुंभार हा बालकलाकार बराच भाव खाऊन गेला आहे . गश्मीर तर नव्या जमान्याचा हिरो आहेच पण कश्मीराने आपला अभिनय फारच छान खुलविला आहे . मराठीला वेगळ्या वाटेवर या सिनेमाने नेवून ठेवले तर नवल नाही वाटणार …. त्यामुळे आता तरी एकदा तरी प्रत्येकाने हा सिनेमा पाहायलाच हवा .