कुठे आहेत अच्छे दिन ? शरद पवारांचा सवाल

Date:

पाटना – कुठे आहेत अच्छे दिन ? सामान्य माणसाला अच्छे दिन तर जवळपास हि दिसेनात … जमिनी काबीज करणारे , आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाकून ठेवणारे हे सरकार आहे असे सांगत आज येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारला टिकेचे  लक्ष्य केले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाटणा येथील राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. सकाळीच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. पक्षाच्या अध्यक्षपदी श्री. शरद पवार यांची फेरनिवडही आज करण्यात आली. पक्षाचे केंद्रीय निवडणूक अधिकारी टी. पी. पिथाम्बरन मास्टर यांनी तशी घोषणा केली. त्यानंतर देशभरातून अधिवेशनासाठी आलेल्या प्रतिनिधींना पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी मार्गदर्शन केले…

काय म्हणाले शरद पवार ते वाचा त्यांच्याच शब्दात …
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्या सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. या अधिवेशनाची सुरुवात करताना आर. आर. पाटील, जे आपल्या पक्षातील निष्ठावान आणि मोठा जनाधार असलेले नेते होते त्यांचे स्मरण करतो. महाराष्ट्र तसेच देशात एनसीपी या पक्षाला मजबूत करण्यातील आर. आर. पाटील यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत पाटणा आणि बिहारची भूमिका सगळ्यांना ज्ञात आहेच. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे बिहारचे सुपुत्र होते. लोकनायक जयप्रकाश बाबू यांचे वास्तव्य पाटण्यामध्येच होते. बिहारच्या राजकारणात पक्ष असो वा विपक्ष… वरिष्ठ नेते जयप्रकाश बाबू यांचे शिष्य सर्व देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. देशात सगळ्यात जास्त प्रमाणात तरुणवर्ग असल्याने आज जगात भारताला अधिक महत्त्व आहे. बिहारच्या एकूण लोकसंख्येपेक्षा ५८ टक्के लोकसंख्या ही १८ ते २५ या वयोगटातील आहे. देशाच्या इतर राज्यांत इतक्या प्रमाणात युवक नाहीत. त्यामुळे भविष्यात देशाच्या विकासात बिहारची भूमिका ही निश्चितच महत्त्वाची राहणार आहे. बिहारमधील तरुण पिढीसोबत संवाद आणि संपर्क वाढविण्याच्या दृष्टिकोनातून याठिकाणी राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना युवा, महिला, अल्पसंख्याक, समाजातील दुर्लक्षित घटक दलित तसेच आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी आणि विकासासाठी झाली आहे, याचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. देशाच्या मतदारांनी आपल्याला विरोधी पक्षाची नवीन जबाबदारी दिली आहे. गेली १० वर्षे केंद्रात आणि १५ वर्ष महाराष्ट्रात सत्तेत राहिल्यानंतर आता विरोधी पक्षाची भूमिका आपल्याला पार पाडायची आहे. गेल्या वर्षभरात आपण सक्षमपणे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली. सरकारने जनतेच्या हितासाठी जे निर्णय घेतले, त्यांचे आम्ही स्वागत केले. परंतु जे निर्णय लोकांच्या हिताविरोधात घेतले गेले, त्यांना कडाडून विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला आणि भविष्यातही हा पक्ष तो करत राहील. अच्छे दिन आयेंगे असं सांगितलं, पण सामान्य माणसाच्या जवळपास कुठेही अच्छे दिन आलेले नाहीत.
मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी स्वत: शेतकरी आहे, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच केंद्रात कृषिमंत्री होतो. त्यामुळे शेतकरी, गाव आणि शेती यांना माझ्या राजकारणात नेहमीच प्राधान्य राहील. सध्या साखर, दूध या व्यवसायात खूप चिंता आहे. सरकारने ठरवून दिलेला एफआरपी दर देणं साखर कारखान्यांना शक्य नाही कारण विक्री दराची तफावत ८०० रुपये प्रतिक्विंटल आहे. अशा परिस्थितीत साखर उद्योगाचं अस्तित्व टिकवणं कठीण आहे. देशाचे पंतप्रधान मन की बात करतात. पण कधीही सामान्य लोकांचे हाल त्यांना सांगितले नाहीत. वर्षाच्या सुरुवातीच्या ३५ दिवसांत फक्त मराठवाड्यातच ९३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, याची त्यांना माहिती नाही का? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीत फेरफार करून, आत्महत्या केलेले शेतकरी नव्हते हे दाखविण्याचा प्रयत्न सरकार करते आहे. देश आज कृषी संकटात असताना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना शेती वाचवणं म्हणजे देश वाचविण्यासारखंच आहे हे मोदी सरकारला मान्य नाही.
हरियाणा, महाराष्ट्र निवडणुकीपुरता भाजप गप्प राहिला. या निवडणुकीत यश प्राप्त केल्यानंतर देशहिताच्या नावाखाली लोकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या जमिनी काबीज करण्याचं षड्यंत्र हे सरकार करतंय. देशातील प्रत्येक शेतकरी भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध राजकाऱणातून होतोय, असं म्हणणं हे दुर्दैवाचं आणि घातक आहे. लोकसभेत भूमी अधिग्रहण कायदा संमत झाला पण राज्यसभेत भाजपची बहुसंख्या नसल्याने, ते बिल पार्लमेंटरी जॉइंट कमिटीकडे पाठवण्यात आलंय. हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असून, जर कायदा पारित केला तर देशातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.
देशातील न्यायव्यवस्था हा सध्या चिंतेचा विषय झाला आहे. लाखो खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. वर्षोनुवर्षे लोकांना न्याय मिळण्याची प्रतीक्षा करावी लागतेय. एका अहवालानुसार देशातील ३ कोटींवर लोक असे आहेत की, ज्यांच्या खटल्यांचे निकाल अजूनही लागले नाहीत. ही गंभीर परिस्थिती आहे. लवकरात लवकर ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे.
गाव आणि शहर यांच्यातील असंतुलन हा देखील मुद्दा आहे. स्मार्ट शहरं उभारतानाच गावांची स्थितीही चांगली असायला हवी. पंतप्रधानांची स्मार्ट सिटी संकल्पना चांगली आहे, मात्र शहरांसोबत गावंही स्मार्ट बनायला हवीत. गावाची उपेक्षा करून स्मार्ट शहर बनविण्याला आम्ही विरोध करू.
घरवापसी, लव जिहाद यासारखे अनुचित प्रकार देशात घडत आहेत. आपसात द्वेष निर्माण केला जातो आहे. पण सर्वधर्मसमभावायाशिवाय भारताचा विकास शक्य नाही.
महाराष्ट्रात आघाडी न झाल्याने दोन्ही पक्षांचं नुकसान झालं. महिला आरक्षण विधेयक संसदेत पारित व्हायला हवं. नाही तर महिला कधीही पुढे येऊ शकणार नाहीत. अंधश्रद्धा ही समाजाच्या विकासासाठी बाधक आहे. बिहारची जनता देशाची परिस्थिती पाहून सांप्रदायिक शक्तींना दूर ठेवण्यासाठी निश्चितच बदल करेल असा मला विश्वास आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जेके टायर-कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया कार रॅलीच्या नवव्या आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवला

नवी दिल्ली, २३ मार्च २०२५ : संसद सदस्यांसाठी प्रतिष्ठित जेके टायर-कॉन्स्टिट्यूशन...

पिंपरी चिंचवडकरांनी अनुभवाला लोकसंस्कृतीचा कलाविष्कार – आ. उमा खापरे

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक...

राजकुमार ठाकूर यांनी मिळविला सहस्रबुद्धे चषक कॅरम स्पर्धेत विजय आणि ठरले चषकाचे मानकरी

पुणेपटवर्धन बाग येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ असलेल्या एरंडवणे...