आजच्या तरुण पिढीने वृक्षसंपदेकडून मिळणार्या लाभाचे देखिल ऑडिट करावे,’ – संगणक तज्ज्ञ डॉ.विजय भटकर
पुणे
पंचवटी भागातील वृक्षप्रेमी के.डी.गारगोटे व विद्या गारगोटे यांनी वेताळ टेकडीवर स्वत: लावलेल्या आणि जपलेल्या 3150 वृक्षांच्या यशस्वी प्रकल्पाला आज पर्यावरण तज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ, खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर,संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, या तीन मान्यवर पुणेकरांनी भेट देऊन वेताळ टेकडीच्या स्वच्छता अभियानात भाग घेतला.
व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट के.डी.गारगोटे व विद्या गारगोटे (वित्त व लेखाधिकारी पुणे विद्यापीठ) यांनी पंचवटी (पाषाण)ला लागून असलेल्या वेताळ टेकडीवर ‘पंचवटी उद्यान’ येथे पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने वृक्ष लागवड व संवर्धन केले आहे.आज दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी पंचवटी उद्यान, स्टेट बँक कॉलनीजवळ, पाषाण रोड,‘स्वच्छता अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानामध्ये शिवाजी झावरे , दिल्ली), सत्यजित गुजर (मुख्य वन संरक्षक, पुणे), वृक्ष अधिकारी मोहन ढेरे, उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे, डॉ. विद्या गारगोटे (वित्त व लेखाधिकारी पुणे विद्यापीठ). अनेक मान्यवर तसेच चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण घेणारे 200विद्यार्थी सहभागी झाले होते.
‘आज सर्व चार्टर्ड अकाऊंटंटचे विद्यार्थी उपस्थित आहेत. या आजच्या तरुण पिढीने वृक्षसंपदेकडून मिळणार्या लाभाचे देखिल ऑडिट करावे त्यामुळे मानवजातीला मिळणारे वरदान लक्षात येईल, आणि वृक्षसंपदा वाढविण्याचे प्रयत्न वाढतील. जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत व त्यांचे संवर्धन केले पाहिजे’. असे संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यावेळी बोलताना म्हणाले.
‘पुणे शहरात कचर्याची समस्या भयंकर आहे.वेताळ टेकडीवर वर आज आपण ‘स्वच्छता अभियाना’ साठी एकत्र आलो आहोत. या अभियानात जो कचरा गोळा केला जाईल तो येथेच जिरवावा. ओल्या कचर्यापासून कंपोस्ट खत तयार करुन येथेच जिरवले गेले पाहिजे’, असे पर्यावरण तज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ म्हणाले.
खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर म्हणाले,‘ के.डी.गारगोटे आणि विद्या गारगोटे यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे.दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे, ज्याप्रमाणे हवेचे, ध्वनीचे प्रदूषण असते त्याप्रमाणे प्रकाशाचे देखिल प्रदूषण सध्या भेडसावत आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करणार्यांना या प्रकाश प्रदूषणाचा त्रास होतो. त्यामुळे वृक्षसंपदाही जपली पाहिजे.’