पुणे – महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी रचलेला स्त्री शिक्षणाचा पाया, अस्पृश्यता- जातिप्रथेविरुद्ध लढा देत सर्वांना समान अधिकार देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य आणि संत गाडगे महाराज यांनी दिलेला स्वच्छतेचा वसा, अशा अनेक महापुरुषांचे प्रबोधनात्मक विचार एकपात्री कलाकारांनी शनिवारी जनतेसमोर मांडले. समाजातील शिक्षणाबद्दलची अनास्था, जाती- धर्मांमधील वैर, अनिष्ट रूढी- परंपरा, अशा अनिष्ट प्रथांवर महापुरुषांची वेशभूषा केलेल्या कलाकारांनी “आसूड‘ उगारला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त “प्रबोधन एकपात्री नाट्य संमेलन‘ आयोजित केले होते. प्रबोधन एकपात्री नाट्य परिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय‘ हा प्रयोग सादर करणारे गुलाब ओव्हाळ या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार ऍड. जयदेव गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. वृषाली रणधीर- मोरे यांनी “मी सावित्रीबाई फुले बोलतेय‘, तर प्रबोधनकार संभाजी पालवे यांनी “मी गाडगेबाबा बोलतोय‘, आरती आमराव यांनी “मी रमाबाई बोलतेय‘ आणि कुमार आहेर यांनी “मी जोतिराव फुले बोलतोय‘ हा एकपात्री प्रयोग सादर केला.
अस्पृश्यता, जातिप्रथा, अनिष्ट रूढी- परंपरा मोडण्याबरोबरच दलित समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक घटनाप्रसंग ओव्हाळ यांनी मांडले. कुमार आहेर व डॉ. वृषाली रणधीर- मोरे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी विचार, शिक्षणाचा वारसा आणि आयुष्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी आपल्या अभिनयाद्वारे मांडल्या. गाडगे महाराज यांनी समाजाला पटवून दिलेले स्वच्छतेचे महत्त्व पालवे यांनी अधोरेखित केले. कलाकारांनी अर्ध्या तासामध्ये महापुरुषांचे कार्य उलगडण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता भारतीय राज्य घटनेच्या प्रास्ताविकाच्या वाचनाने झाली.
अनिष्ट प्रथांवर महापुरुषांची वेशभूषा केलेल्या कलाकारांचा “आसूड‘
Date: