पुणे : मुद्रा बँक योजनेच्या लाभासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकच्या बँकेशी किंवा ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे, त्या बँकेशी संपर्क करुन मुद्रा बँक योजनेतून कर्ज घ्यावे आणि यशस्वी उद्योजक बनावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी आज येथे केले.
मुद्रा बँक योनजेच्या प्रसारासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्रारथाला झेंडा दाखवून अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी मार्गस्थ्ा केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, माहिती उपसंचालक मोहन राठोड, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील, अग्रणी बँकेचे जिल्हा वित्तीय साक्षरता अधिकारी पी.एस.सरडे, नोडल ऑफीसर श्रीमती तनुजा उरणकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.काळे म्हणाले की, विना जामिनदार ‘मुद्रा’ योजनेद्वारे व्यावसायीकांना कर्ज उपलब्ध होणार आहे. कर्जासाठी जामिन होणं आणि जामिनदार मिळवणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. मुद्रा बँक योजनेमुळे ही अवघड गोष्टच निकाली निघाली आहे. विना जामिनदार कर्ज योजनेमुळे व्यावसायिकांना अतिशय फायदा होत असल्याचेही ते म्हणाले. राज्यात पुणे जिल्हयात सर्वात जास्त मुद्रा बँक योजनेमध्ये कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील निवडक गावांमधून मुद्रा बँक योजनेची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.