पुणे- स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य जितके महत्वाचे आहे, तितकेच त्यांचे मराठी भाषेतील योगदानही मोलाचे असल्याचे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. मराठी भाषेच्या शब्दसंग्रहात ‘महापौर’सारखे अनेक महत्वाचे शब्द सावरकरांनी सुचविले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असणार्या महापौर टिळक यांनी आज महाविद्यालयातील वसतिगृहात सावरकरांचे वास्तव्य असणार्या खोलीत जाऊन त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर ग्रंथालयातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन महापौर टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. वसतिगृहाची क्षमता १७५ असून, येणार्या शैक्षणिक वर्षात त्याचे काम पूर्ण होईल.
पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेतात, मात्र वसतिगृहे व अभ्यासिकांची संख्या तुलनेने कमी आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्राधान्य देणार असल्याचे, महापौर टिळक यांनी यावेळी सांगितले.
सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. आनंद भिडे, संचालक किरण शाळिग्राम, राम निंबाळकर, महेश आठवले. फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. आर. जी. रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती.