बेंगलोर -स्पाय कॅमेरा वापरुन कॉलेजमधल्या तरुणींचे हॉस्टेल बाथरुममधील व्हिडिओ शूट करणाऱ्या इंजिनिअरींगच्या एका विद्यार्थ्याला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धार्थ (२१) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा तामिळनाडूचा आहे. बंगळुरुतील कॉलेजमध्ये तो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. हॉस्टेलमधल्या तरुणींचे व्हिडिओ बनवण्यासाठी तो त्याच्या प्रेयसीची मदत घेत होता. व्हिडिओ बनवल्यानंतर तो ते फेसबुकवर अपलोड करायचा अशी माहिती पारापान्न आग्रहारा पोलिसांनी दिली.
पोलिसांनी चौकशीसाठी सिद्धार्थच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. मी सिद्धार्थच्या प्रेमात असताना त्याला माझा न्यूड व्हिडिओ बनवून पाठवला होता असे तिने सांगितले. सिद्धार्थ दुसऱ्या मुलींचे बाथरुममधले व्हिडिओ शूट करण्यासाठी मला ब्लॅकमेल करत होता असे तिने पोलिसांना सांगितले. तपासात सिद्धार्थची प्रेयसी खोटे बोलत असल्याचे लक्षात आले तर तिला सुद्धा लगेच अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. त्याची प्रेयसी सुद्धा तामिळनाडूची आहे.
कॉलेजमधली २१ वर्षीय विद्यार्थिनी फेसबुकवर सर्च करत असताना तिला तिचे न्यूड फोटो आढळले. हे बनावट अकाऊंट होते. तिने आणखी सर्च केले असता तिला तिचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ सापडले. ही विद्यार्थिनी मूळची आंध्र प्रदेशची आहे. जेव्हा पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला तेव्हा बदनामी होईल म्हणून त्यांनी तक्रार दाखल करु नको असे सांगितले.
२८ जुलैला या मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली व व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. तपासामध्ये सिद्धार्थने आणखी तीन मुलींचे व्हिडिओ अपलोड केल्याचे समोर आले. या तिन्ही तरुणी सिद्धार्थच्या प्रेयसीच्या मैत्रिणी होत्या. सिद्धार्थ या तरुणींकडे लैंगिक सुखाची मागणी करायचा. तरुणीने नकार दिला तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. पोलिसांनी हे सर्व व्हिडिओ आणि फोटो डिलीट केले आहेत. तो त्याच्या प्रेयसीकडे स्पाय कॅमेरा द्यायचा. त्याची प्रेयसी पीडित मुलींच्या बाथरुममध्ये तो कॅमरा ठेवायची.