महापौर पदाचे खरे दावेदार आहेत तरी कोण ?
पुणे- पुण्याच्या महापौर पदी भाजपच्याच नगरसेवकाची वर्णी सहज लागणार असली तरी या पदासाठी उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची यासाठी मात्र हा काळ भाजपच्या नेत्यांसाठी मोठा कसोटीचा असा मानला जातो आहे.
पुण्याच्या महापौर पदाच्या शर्यतीत सध्या महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येतेय .असे असले तरी या पदाचे खरे दावेदार किंवा हक्कदार कोण, कोण आहेत यावर देखील भाजपच्या गोटात निश्चितच मंथन होताना दिसते आहे .शहरातील भाजपच्या राजकीय वर्तुळाला चैतन्य देणे आणि नवे तेज देणे गरजेचे झालेले आहे या पार्श्वभूमीवर आता महापौर देताना या पक्षाला सर्वांगीनदृष्ट्या विचार करूनच याबाबत निर्णय करावा लागणार आहे हे हि तेवढेच खरे आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली त्यास राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील भाजपचा कारभार, शिवसेनेशी झालेली युती असे अनेक कंगोरे असले तरी स्थानिक पातळीवरील महापालिकेचा कारभार हे देखील एक कारण मानले जायला हवे .यावर सर्वांचे एकमत होताना दिसते आहे. त्या दृष्टीने मोहोळ यांना गेल्या अडीच वर्षाच्या काळात या टर्म मधील ५ पैकी झालेले २ महापालिकेचे अर्थ संकल्प करण्याची सुवर्ण संधी मिळाली होती . या बजेट द्वारे त्यांनी शहराचा कारभार त्यांच्या दृष्टीने चमकदार करण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र त्याचा फारसा प्रभाव ना शहरावर ,ना त्यांच्या खुद्द विधानसभा मतदार संघात, मतांच्या माध्यामतून स्पष्ट होवू शकला .त्यांच्या मतदार संघात चंद्रकांतदादा पाटील यांना गिरीश बापटांना खासदारकीत मिळालेल्या मताधिक्याएवढेच नव्हे तर त्याहून निम्मे मताधिक्य देखील मिळू शकले नाही .असे असले तरी आगामी काळात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी च्या तुफानी माऱ्याला तेच सामोरे जावू शकतात असा दावा करीत त्यांचे नाव महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर आलेले दिसते आहे. एवढेच नाही तर कोथरूडवर बाहेरचा उमेदवार लादल्याने झालेला अन्याय दूर करायचा म्हणून हि त्यांच्या नावाकडे या पदाच्या शर्यतीत पाहिले जाते आहे. पण प्रत्यक्षात चंद्रकांत दादांच्या कायम सोबत राहूनही कोथरूडच्या मतांची आहे,होती ती आघाडी कायम राहू शकलेली नाही याकडे ही दुर्लक्ष निश्चित करता येणारे नाही .
अडीच वर्षातील महापौरांची कारकीर्द कशी राहिली ? यावर वाच्यता न केलेली बरी ,त्याबाबत भाजपचे नगरसेवकच काय नगरसेविका देखील खाजगीत काय सांगायचे ते सांगतील . महापालिकेतील सभागृहनेते पद ज्यांच्याकडे आहे ते श्रीनाथ भिमाले यांनी मात्र पक्षाची जेवढी आब राखता येईल तेवढी राखण्यासाठी केलेली चतुराई अडीच वर्षातीलत्यांच्या कारभारातून आणि मुख्य सभेत दिसून आली . विधानसभेला भाजपच्या हातून आता २ जागा गेल्यात पण भिमाले यांच्या ऐवजी दुसरा कोणी पालिकेत सभागृह नेता असता तर कदाचित किमान चार जागा तरी निश्चितच पक्षाला गमवाव्या लागल्या असत्या यावर हि बऱ्याच अंशी सहमती होताना दिसते आहे. अशा परिस्थितीत जुने ,जाणकार ,राजकारणाचे डावपेच माहिती असलेले ,प्रशासनाला अंकित ठेवणारे आणि सर्वाधिक जनतेच्या मनाचा ठाव असणारे ,सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते म्हणून त्यांनी निश्चितच लौकिक मिळविला आहे. त्यामुळे खरे दावेदार म्हणून भिमाले यांचे नाव निश्चितच आघाडीवर असायला हवे असा मतप्रवाह आहेच शिवाय .जुने निष्ठावंत म्हणून कविता वैरागे,मंजुश्री खर्डेकर यांनाही संधी आता मिळायला हवी असेही मत मांडले जाते आहे .पण महिलांना आता संधी मिळेल असे दिसत नाही.पक्षात आलेले शंकर पवार ,प्रसन्न जगताप यांच्यावर हि अन्याय होवू नये म्हणून त्यांचाही उल्लेख या पदाचे दावेदार म्हणून होताना दिसतो आहे.हेमंत रासने हे हि या पदाचे दावेदार आहेत ,पण कसब्यात यापूर्वीचा महापौर दिला,आताचा आमदार दिला ,आताचा खासदार दिला …असा इतिहास असल्याने त्यांच्या सारख्या कार्यकर्त्याची कुचंबना होवू शकणार आहे. पण स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर तरी त्यांना आता विराजमान करता येईल अशी स्थिती असल्याचे सांगितले जातेय.
असाही एक प्रवाह –
दुसरा प्रवाह असा आहे की आता खूप झाले जुने जाणते ज्येष्ठ, आता नवे चेहरे द्या पक्षाला ,नवी उमेद बहरू द्यात, नवे तेज पक्षाला देवू द्यात ,खा. बापटांच्या गौरव ला आता प्रवाहात सळसळू द्यात आणि त्याच्याच बरोबरीने निघालेल्या कार्यकर्त्यांना उभारी द्या असा आग्रह ,भाजपची पीछेहाट झाल्याने प्रकर्षाने मांडला जावू लागला आहे. त्या दृष्टीने अमोल बालवडकर यांचे नाव आघाडीवर घेतले जातेय . त्याचबरोबर दिपक पोटे,उमेश गायकवाड ,सुशील मेंगडे आणि राणी भोसले यांची नावे प्रामुख्याने घेतली जात आहेत .या सर्वांनी गेल्या अडीच वर्षाच्या कारभारात आपापली चुणूक दाखविली आहे. तरुण उमदा चेहरा जनतेच्या प्रश्नांची तड लावणारा अशी या सरांचीच प्रतिमा बनत चाललेली आहे. मुख्य सभेत अधिकार्यांच्या बेमुर्वतखोरीला लगाम घालण्यासाठी ‘आम्ही काय आता यांना प्रेम पत्रे लिहायचीत काय ‘ असा जळजळीत सवाल असेल किंवा पाण्याच्या प्रश्नावर, किंवा थेट जनतेशी संबधित प्रश्नांवर प्रशासनाला फटकारे मारून जागेवर आणायचे प्रयत्न असतील असे सारे या सर्व तरुणाईने केले .याबरोबर आदित्य माळवे या हि नावाचा यात समावेश होईल .पण यांना ज्या ‘पदा’ ने साथ द्यायला हवी होती त्या पदाने ‘त्या त्या वेळी ‘साथ दिली नाही हे स्पष्ट दिसलेले आहे. उमेश गायकवाड यांनी ५ हजाराची बाके कशी १० ते 14 हजाराला खरेदी केली जातात याचा पर्दाफाश केलेला अनेकांना आठवत असेल. आणि दिपक पोटे, धीरज घाटे यांनी राष्ट्रवादीच्या अगदी हुशार ,प्रतिभावान नगरसेवकाचा भर सभागृहात वारंवार केलेला सामना अनेकांना आठवत असेल .आपल्या जागेवरून या सर्वांनी प्रशासनामुळे भाजपलां आणि भाजपच्या प्रतिनिधींना नामुष्की पत्करावी लागते आहे हे वेळोवेळी सभागृहनेत्यांनी दिलेल्या संधीमुळे दाखवून दिले .पण प्रशासनाला लगाम घालताना प्रत्येकवेळी त्यांना केवळ सभागृह नेत्याची साथ मिळाली . खरे तर सर्व प्रश्नांची चाड लावता येते ,प्रशासनाच्या बेमुर्वतखोरीला लगाम घालता येतो असा जाहीर आखाडा म्हणजे महापालिकेची मुख्य सभा … आणि या मुख्य सभेचा गाडा दोन चाकांवर चालतो ..त्यापैकी केवळ एकाच चाकाची त्यांना साथ मिळाली आणि किमान आपली चुणूक त्यांना दाखविता आली .
भाजपमधील असे सर्व नगरसेवक महापौर पदाचे खरे दावेदार आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही .पण भाजपचे नेते काय करतील हे त्यांनाच ठाऊक …