पुणे- हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर कसबा पेठेत भाजपचा पारंपरिक मतदार असलेला ब्राम्हण समाज नाराज झाल्याच्या बातम्या वारंवार वाचायला ,ऐकायला मिळत आहेत . याच अनुषंगाने कसब्यात आता पुन्हा एकदा बॅनरबाजी करण्यात आली असून या माध्यमातून ब्राम्हण समाजावर अन्याय होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.काय म्हटले आहे या फलकातून …
आमचेही ठरले आहे, धडा कसा शिकवायचा…
कसबा हा गाडगीळांचा
कसबा हा बापटांचा…
कसबा हा टिळकांचा
का काढला आमच्याकडून कसबा
आम्ही दाबणार नोटा
मोदी गणपती मंदिराबाहेर हा फलक लावण्यात आला आहे.
याआधीही,
‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली होती. तर आता कसबा पेठ पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाचे तिकीट कापत ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे.