( जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले करणार मार्गदर्शन )
पुणे- जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य अभिनय कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ‘क्यूब नाईन’ व एच.आर झूम फिल्मस् या संस्थांनी भरवली असून २९ मे रोजी सायं. ५ ते ७ या वेळेत नेहरू मेमोरीअल हॉल, एस जी एस मॉल जवळ, कॅम्प, पुणे येथे पार पडणार आहे. अभिनयाबाबत विविध गोष्टींचे मार्गदर्शन जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून दिले जाणार आहे. या कार्यशाळेद्वारे विध्यार्थांना अभिनेते विक्रम गोखले यांच्याशी थेट संवाद साधता येणार असून त्यांच्या तर्फे सर्व शंकांचे निरसन केले जाईल.
विक्रम गोखले यांच्या बरोबर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्यकारी निर्माते संजय ठुबे, प्रसिद्ध वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे अशा चित्रपटसृष्टीतील दिग्गज मान्यवरांचे मार्गदर्शन देखील मिळणार आहे. तरी अभिनय क्षेत्रात पदार्पण व करिअर करणाऱ्यांनी जास्ती जास्त संख्येने या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यशाळेबाबत अधिक माहिती हवी असल्यास ०२० – ६५२४२१२१ यावर संपर्क करावा.
अभिनेते गोखले म्हणाले, सध्या अभिनयाचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक कार्यशाळा आहेत. त्यांचा पैसे कामिवणे हाच प्रमुख उद्देश असतो. या प्रवृत्तीला फाटा देत आम्ही ज्या नवोदित कलाकारांना अभिनय क्षेत्रात पदार्पण अथवा करिअर करायचे आहे. अशांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्याच बरोबर चेहऱ्यावरील हावभाव, अभिनयाचे विविध पैलू या एकेदिवशी कार्यशाळेत शिकवले जाणार आहेत. अभिनयक्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या तरुण कलाकारांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विक्रम गोखले यांनी असे सांगितले.