पुणे, ३० सप्टेंबर २०१७ : महान विचारवंत साहित्यिक राल्फ वाल्डो इमर्सन यांनी म्हटले आहे, “सर्व जीवनच एक प्रयोग आहे. तुम्ही जेवढे अधिक प्रयोग करता तितके उत्तम.”अन्वम नागपाल (वय १७), आर. सिद्धार्थ (वय २४) आणि अन्विका नागपाल (वय १२) या तिघांनी एकत्र येऊन काचेचे देखणेपण आणि प्रकाशाची चमक यांच्या समन्वयातून ‘अर्बोल द ला लुझ’ (ट्री ऑफ लाईटसाठीचा स्पॅनिश शब्द) ही शिल्पकृती साकारली आहे. वापरलेल्या काचेच्या बाटल्या, विविध प्रकाश आणि इतर सामग्रीचा कुशल वापर करुन त्यांनी निसर्गाचा एक महान चमत्कार आविष्कृत करणारा अनोखा प्रकाशवृक्ष निर्माण केला आहे. त्याचबरोबर फेरप्रक्रिया (रिसायकलिंग) ही रंजक कृती कशी ठरते, याचाही वस्तुपाठ घालून दिला आहे.
‘सिम्बॉयसिस’चे संस्थापक व अध्यक्ष, पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजूमदार यांच्या हस्ते आज ८१, क्लोव्हर हिल्स, एनआयबीएम रोड, पुणे येथे या शिल्पकृतीचे अनावरण झाले.
‘अर्बोल द ला लुझ’ ही शिल्पकृती ९ फूट उंच व एक टनाहून अधिक वजनाची आहे. त्यात १०० हून अधिक बाटल्या व किमान २५० प्रकाशांचा वापर करण्यात आला आहे. ही कलाकृती साकारताना या तिघांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. अन्वम आणि अन्विकाचे वडील अपूर्व नागपाल (अधिक माहितीसाठी संकेतस्थळ – http://www.apurvnagpal.com) गेली अनेक वर्षे वापरलेल्या बाटल्या जमा करत होते. त्यातून त्यांना एक व्हिंटेज कार बनवायची होती. नंतर ती कल्पना सोडून देऊन त्यांनी यातून एक झाड निर्माण करण्याची साधी कल्पना मांडली. तेही तितके सोपे नव्हते.
यासंदर्भात अन्वम राजपाल म्हणाला, “झाडाच्या प्रत्येक स्तराची जुळणी व जोडणी करणे, त्यातील प्रत्येक फांदीला प्रकाश देणे, तो पोकळ्यांमधून नागमोडी नेणे, या गोष्टी प्रकल्पाचा सर्वाधिक अवघड भाग होत्या. मात्र या आव्हानांवर मात करणे, तसेच गेले सहा महिने हा प्रकल्प काही थोड्या बाटल्यांपासून ते अगदी फांद्या आणि फळांनी परिपूर्ण अशा झाडापर्यंत पूर्ण होताना बघणे हीसुद्धा मोठी मौज होती.”
सिद्धार्थ म्हणाला, “काचेला आधार देणे व तरीही ती लवचिक ठेवणे जेणेकरुन जसजसा प्रकल्प विकसित होत जाईल तसतशी रचना बदलेल, हा भाग मला सर्वात औत्सुक्याचा वाटला. बाटल्यांच्या कडा, विविध आकाराच्या बाटल्यांची उपलब्धता, त्यांचे रंग अशा सर्व घटकांनी ही रचना निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि रचना साकारताना अनेक स्रोतांकडून मतप्रदर्शनाचीही कमतरता नव्हती.”
बाटल्या पडू न देता पक्क्या चिकटवण्याच्या कामात अन्विका गढून गेली होती. ती म्हणाली, “आम्ही या बाटल्या चिकटवलेल्या स्थितीत स्थिर राहाव्यात, यासाठी सुपरग्लू, सिलिकॉन, चिकणमाती व अगदी वायर वापरुन अनेक चाचण्या केल्या. अखेर विविध बाटल्या व आकारांची कल्पक रचना करुन आणि विशेषतः झाडाच्या वेगवेगळ्या भागांसाठी निरनिराळ्या माध्यमांचा एकत्रित वापर केल्याने आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला.”
हा प्रकल्प अगदी सहज साकारला नाही. उलट तो दमवणूक करणारा, कठीण, आव्हानात्मक आणि प्रसंगी निराशाजनकही होता. तरीही या तिघांसाठी तो अविस्मरणीय ठरला आणि काही बाटल्यांपासून अख्खे झाड साकारल्यावर ती कलाकृती प्रेरणादायी आणि समाधान देणारी ठरली. वापरलेल्या सामग्रीवर फेरप्रक्रिया करताना आपल्यातील कल्पकतेची उर्मी बाहेर काढणे, हे खरोखर परिपूर्तीचा अनुभव देणारे होते.
ट्री ऑफ लाईट साकारणाऱ्या तिघा कलाकारांविषयी :
अन्वम नागपाल (वय १७) हा सिम्बॉयसिस इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याला विविध क्षेत्रांत रस आहे, ज्यात वादविवाद स्पर्धा (त्याने काही मॉक युएन्समध्ये विजेतेपदही मिळवले आहे.), फूटबॉल (नुकत्याच झालेल्या फूटबॉल कॅम्पमध्ये सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक), चित्रपट, संगीत, कला व छायाचित्रण (कल्पक इन्स्टाग्रामर) यांचा समावेश आहे. तो अनुभवी पर्यटकही आहे. त्याने वयाच्या दुसऱ्या वर्षीच आपली पारपत्र पुस्तिका (पासपोर्ट बुकलेट) पूर्ण केली होती.
आर. सिद्धार्थ (वय २४) हा नुकताच आयआयएम अहमदाबादमधून उत्तीर्ण झाला आहे. (तेथे त्याने अपूर्व शिकवत असलेला अभ्यासक्रम निवडला होता.) सध्या तो आरबीएल बँकेच्या कॉर्पोरेट बँकिंग विभागाचा कर्मचारी आहे. त्याला इतिहास, वाचन, कला, गेमिंग व धावण्याच्या क्रीडाप्रकारात रस आहे. तो उत्तम खवय्या असून त्याला मित्रांसमवेत नव्या रेस्टॉरंट्समध्ये जाणे आवडते.
अन्विका नागपाल (वय १२) ही व्हिबग्योर हाय इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. ती नृत्यपारंगत असून अनेक समूहनृत्यांमध्ये तिने प्रशंसनीय कामगिरी करुन दाखवली आहे. तिला हिंदी व इंग्रजी गाणी गाण्याची आवड असून ती गानवृंदामध्ये गायनाचा सराव करते. अन्विकाला जगभर प्रवास करण्याची आकांक्षा आहे. तिने गेल्या तीन फिफा वर्ल्ड कप फूटबॉल स्पर्धांना उपस्थिती लावली आहे.