इंद्रायणी महाविद्यालात मानवाधिकार दिनानिमित्त कार्यक्रम
पिंपरी-
मानवी अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे. नागरीकांनी आपले कर्तव्य पार पाडले, तर आपला देश मागे राहणार नाही, असे प्रतिपादन पुणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधिक्षक माणिकराव बाकरे यांनी केले.
जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माणिकराव बाकरे बोलत होते. यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ. डी.डी. बाळसराफ, उपप्राचार्य डॉ. एस. के. मलघे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. जैन, प्रा. मिलिंद खांदवे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माणिकराव बाकरे म्हणाले, की माणसाने आपले मानवी अधिकार डावलले गेल्यास आपण तक्रार दाखल करून न्याय मिळवला पाहिजे. मानवाधिकार कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय, शिक्षण असे सर्व हक्क आहेत. मूल्यांच्या जोपासणेसाठी प्रत्येक नागरीक सजग असला पाहिजे. जगण्याचा आणि विकास साधण्याचा हक्क जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे, ही कल्पना मानवी हक्कांचा आधार आहे. शोषण, असुरक्षितता, दहशतवाद दूर करावयाचा असेल, तर मानवी हक्कासंबंधी जागरूकता वाढली पाहिजे, असेही ते म्हणाले.
डॉ. डी.डी. बाळसराफ म्हणाले, विद्यार्थ्यांनी कायद्याचे आणि शिस्तीचे पालन केले पाहिजे. तसेच माणसाने स्वत: आनंदी राहून दुसर्यालाही आनंद दिला पाहिजे. तळेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. एस. के. मलघे म्हणाले, न्यायाची संकल्पना ही मूळतः मानवी अध्किारावर आधारलेली आहे आणि अधिकार म्हणजे काय, तर जगण्याची साधने व सुरक्षितता प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे स्वातंत्र्य. अर्थात स्वातंत्र्य हेही मानवी अधिकाराचेच दुसरे नाव आहे. मानवी हक्क प्रत्येक व्यक्तीला जन्मत: प्राप्त होतात. कोणतेही शासन, संघटन व व्यक्ती हे हक्क देत नाही, म्हणून ते हिरावून घेण्याचा हक्कही कोणाला नसतो.
यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, गोरख काळोखे, खजिनदार केशवराव वाडेकर, सचिव रामदास काकडे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. एस.के. मलघे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मिलिंद खांदवे यांनी, तर आभार फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. जैन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.