पुणे, – बालगंधर्वांच्या गायकीचे वैशिष्ट्य खुप वेगळे होते असे आपण नेहमी म्हणतो पंरतू ते वेगळेपण शब्दात मांडायचे झाल्यास बालगंधर्वांच्या गायकीत भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे दर्शन घडते, अशा शब्दात प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांनी बालगंधर्वांच्या गायीकेचे वर्णन केले.
अनुबंध प्रकाशन आणि संवाद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्वांच्या 130 व्या जंयतीनिमित्त आणि बालगंधर्व नाट्यगृहाच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त व्यंकटेश श्रीपाद राजहंस लिखित ‘असा हा राजहंस’ या पुस्तकाच्या प्रकाशन संमारंभ प्रसंगी आनंद भाटे बोलत होते. डॉ. माधवी वैद्य यांनी या आत्मकथनपर पुस्तकाचे संपादन केले आहे. यावेळी ज्येष्ठ किर्तनकार चारुदत्त आफळे, सुमती दसनूरकर, व्यकंटेश राजहंस यांची कन्या नीलांबरी बोरकर, किर्ती शिलेदार, मेघराज राजेभोसले, निकिता मोघे, लता शिलेदार, सुनिल महाजन, अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
भाटे म्हणाले की, माझे पणजोबा बालगंधर्वांचे समकालीन होते. त्यामुळे लहानपणापासूनच मी आमच्या घरात बालगंधर्वांची गायकी, शैली आदी चर्चा ऐकत आलो आहे. बालगंधर्व हे माझ्यासाठी कुठल्या दैवतापेक्षा कमी नाहीत. यावेळी भाटे यांनी ‘एकच प्याला’ या नाटकातील ‘प्रभो जी गमला मनी तोषिला’ ही भैरवी सादर केली.
डॉ. वैद्य म्हणाल्या की, बालगंधर्व परिवाराशी आमचे फार जुणे ऋणानुबंध असून या पुस्तकाच्या संपादनाच्या कामामुळे मी थोडे तरी त्या कुटुंबाच्या ऋणातून मुक्त होईल असे वाटते. या पुस्तकाचे हस्तलिखीत बालगंधर्वांच्या सख्या भावाने लिहिले आहे आणि त्या हस्तलिखीताचे संपादन करुन पुस्तकरुपाने बालगधर्वांच्या चाहत्यांसमोर मांडत आहे. हे केवळ पुस्तक नसून हा एक ऐतिहासीक दस्तावेज आहे, हे पुस्तक वाचकांसमोर आणतांना कथात्मक स्वरुप अवलंबण्यात आले असून त्या काळातील भाषा वापरून तो भूतकाळ भविष्यकाळाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. बालगंधर्वांच्या कुटुंबियांनी त्यांच्याकडील दस्तावेज जपून ठेवल्यामुळेच हा दस्तावेज आपल्या हाती पडला आहे. या निमित्ताने अशा दिग्गज पंरपरेशी जोडलेल्या कुटुंबियांनी त्यांच्याकडील दस्तावेज जपावे आणि योग्य व्यक्तीच्या हाती योग्य त्या वेळी सुपूर्त करुन पुढील पिढीला अभ्यासाला उपलब्ध करुन द्यावे.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पूर्वाश्रमीचे रमणबागेचे शिक्षक ज्येष्ठ किर्तनकार चारुदत्त आफळे यांचा ‘मम आत्मा गमला’ हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल महाजन यांनी केले.
बालगंधर्वांच्या गायकीत भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे दर्शन घडते
Date: