मुंबई :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 14व्या योनेक्स सनराईज-एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात थानिया गोगुलामांडा, नैनिका रेड्डी यांनी, तर मुलांच्या गटात वेदांत भसीन, अर्णव पापरकर यांनी दुहेरी गटांतील विजेतेपदाबरोबरच एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या वेदांत भसीन याने अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या समर्थ संहिता याचा 6-4, 6-1 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. दुसऱ्या लढतीत दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर याने कर्नाटकाच्या चौथ्या मानांकित तनुष घडियालचा 6-4, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात तामिळनाडूच्या अव्वल मानांकित थानिया गोगुलामांडाने चौथ्या मानांकित ओरिसाच्या सोहिनी मोहंतीचा 6-3, 6-1 असा तर, तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या नैनिका रेड्डी हिने तेलंगणाच्या रिशीता बासिरेड्डीचा 2-6, 6-2, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली.
दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात वेदांत भसीन याने अर्णव पापरकरच्या साथीत दक्ष कुकरेती व कंज शहा यांचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. तर, मुलींच्या गटात थानिया गोगुलामांडा व नैनिका रेड्डी यांनी दिव्या अंग्रीश व आकृती सोनकुसरे यांचा 7-5, 7-6(3) टायब्रेकमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील दुहेरी गटातील विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उपांत्य फेरी: मुले:
वेदांत भसीन(महाराष्ट्र)(3)वि.वि.समर्थ संहिता(महाराष्ट्र)(1)6-4, 6-1;
अर्णव पापरकर(महाराष्ट्र)(2)वि.वि.तनुष घडियाल(कर्नाटक)(4)6-4, 7-5;
मुली:
थानिया गोगुलामांडा(तामिळनाडू)(1)वि.वि.सोहिनी मोहंती(ओरिसा)(4)6-3, 6-1;
नैनिका रेड्डी(महाराष्ट्र)(3)वि.वि.रिशीता बासिरेड्डी(तेलंगणा)2-6, 6-2, 6-3;
दुहेरी गट: मुले:अंतिम फेरी:
वेदांत भसीन/अर्णव पापरकर वि.वि.दक्ष कुकरेती/कंज शहा 6-2, 6-2;
मुली:
थानिया गोगुलामांडा/नैनिका रेड्डी वि.वि.दिव्या अंग्रीश/आकृती सोनकुसरे 7-5, 7-6(3).