युवा आणि प्रतिभावान निपुण धर्माधिकारी ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण करतो आहे, हे जाहीर झाले तेव्हा त्याच्या चित्रपटात कोणकोण काम करत आहे, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. या चित्रपटाचे जे टीजर प्रसारित झाले त्यांमध्येही या चित्रपटात काम करणाऱ्या कोणत्याही स्टारचे नाव घोषित करण्यात आले नव्हते.
आता निपुण म्हणतो, “आता मला जाहीर करायला आनंद होत आहे की, बहुआयामी आणि ज्यांना या क्षेत्रात सर्वाधिक मान दिला जातो ते सचिन खेडेकर ‘बापजन्म’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती सुमतिलाल शाह आणि ‘सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर’ने केली आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १५ सप्टेंबर २०१७ रोजी प्रदर्शित होत आहे.”
या चित्रपटाबद्दल बोलताना सचिन खेडेकर म्हणाले, “बापजन्म’ हा शब्द मराठीमध्ये प्रचलित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण करत आहे म्हटल्यावर या चित्रपटाबद्दल साहजिकच उत्सुकता ताणली गेली आहे. या चित्रपटाच्या संहितेबद्दल सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्यांत विनोद आणि संवेदनशीलता ठासून भरली आहे. मुलगा आणि त्याचे वडील या विषयावर अनेक चित्रपट आत्तापर्यंत आपण पहिले आहेत. पण निपुणने त्याच्या या चित्रपटात हे नाते अगदी वेगळे आणि अधिक समजुतदारपणे साकारले आहे. जो माणूस संवेदनशील नाही त्याच्या संवेदानांबद्दल काही बोलणे हे कठीण काम असते. आम्ही सर्वांनी हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे. निपुण हा आजच्या पिढीचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. या चित्रपटात त्याने त्याची सर्जनशीलता खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे.”
‘बापजन्म’मध्ये सचिन खेडेकर आणि निपुण धर्माधिकारी हे दोन प्रख्यात कलाकार एकत्र आले आहेत. त्याचमुळे या क्षेत्रातील मंडळी आणि अगदी प्रेक्षक या दोघांचीही उत्कंठा अगदी ताणली गेली आहे आणि ते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. सचिन खेडेकर यांच्या नावावर २००हूनही अधिक चित्रपट, अनेक दूरचित्रवाणी मालिका आणि कित्येक प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत. निपुण धर्माधिकारी हा असा मराठी कलाकार आहे कि ज्याच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. निपुणचा २०१५मध्ये ‘फोर्ब्स इंडियाज 30 अंडर 30’मधील एक विजेता म्हणून सन्मान झाला. त्याचबरोबर २०१६ मध्ये ‘फोर्ब्स एशियाज 30 अंडर 30’ म्हणून गौरव झाला.
‘बापजन्म’चे संपूर्ण लेखन निपुण धर्माधिकारीने केले आहे. त्याने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या चित्रपटात काम केले असून तो मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. ‘अमर फोटो स्टुडीओ’ हे त्याचे अलीकडील नाटक रंगभूमीवर उत्तमरीत्या सुरु आहे. त्याने भारतीय डीजीटल पार्टीसाठी सादर केलेल्या कास्टिंग काऊच वुईथ अमेय अँड निपुण या वेबशोच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला.
‘बापजन्म’चे सदरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे आहे. या कंपनीने आत्तापर्यंत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २’ यांसारखे अनेक गाजलेले चित्रपटांची निर्मिती केली आहे.