पुणे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ ही योजना सुरू केली जाणार आहे. सामाजिक कार्यामध्ये अनेक वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यांना काही ना काही कारणाने आर्थिक साहाय्याची आवश्यकता निर्माण होते, अशा कार्यकर्त्यांना या योजनेअंतर्गत नित्य वा नैमित्तिक अशा स्परूपात पूरक निधी दिला जाणार आहे.
अनेकविध संस्था, संघटनांमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते पंधरा, वीस, पंचवीस वर्षे असा प्रदीर्घ काळ निरपेक्षपणे काम करतात, त्यातील काही जणांना आर्थिक मदतीची गरज निर्माण होते. ज्या कार्यकर्त्यांना अशा मदतीची आवश्यकता असेल, अशांचा शोध घेऊन त्यांना उचित आर्थिक मदत करणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
आर्थिक मदतीची आवश्यकता असलेल्या कार्यकर्त्यांना जनकल्याण समितीने आर्थिक मदत केली, तर मी समाजासाठी अनेक वर्षे काम केल्यानंतर मला आवश्यकता निर्माण झाली तेव्हा समाजही माझ्या मदतीला आला, असे समाधान त्या कार्यकर्त्याला मिळावे, ही या योजनेमागची भावना आहे. त्याबरोबरच निरपेक्ष भावनेने समाजाची सेवा केलेल्या कार्यकर्त्यांबद्दल समाजानेही कृतज्ञ असले पाहिजे, तसेच हा कृतज्ञ भाव समाजाने या ना त्या रूपाने व्यक्त केला पाहिजे हा संस्कार नव्या पिढीवर व्हावा, अशीही या योजनेमागील भावना आहे.
या योजनेसाठी जनकल्याण समितीने कायमस्वरुपी निधी निर्माण केला असून त्यातून समाजसेवकांना काही निकषांवर सहाय्यता निधी दिला जाईल. तसेच दानशूर व्यक्तींच्या इच्छेनुसार या निधीत भरही घातली जाणार आहे.
दीर्घकाळ काम केलेल्या समाजसेवकाला आवश्यक ती मदत समाजानेच दिली पाहिजे या जाणीवेतून पुण्यातील एका दानशूर व्यक्तिने दीड कोटी रुपयांची देणगी जनकल्याण समितीकडे दिली आहे. या स्थायी निधीच्या व्याजातून समाजसेवक सहाय्यता निधी योजना राबविली जाणार आहे.
सहाय्यता निधीसाठी जनकल्याण समितीने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती नावांची निवड करेल. या योजनेअंतर्गत निधी देणार्यांना आयकर विभागाची ८० जी सवलत आहे. ज्यांना या योजनेचा लाभ हवा आहे अशा समाजसेवकांनी तसेच ज्यांना योजनेत निधी द्यायचा आहे, अशांनी पुढील क‘मांकावर संपर्क साधावा ०२०-२४३२४०७१ किंवा ९४२३५००२३६ असे आवाहन करण्यात आले आहे.