पुणे-पुण्यातील महिलांचा समूह असलेल्या ‘पुला’ या पुणे लेडीस फेसबुक ग्रुप ने छोट्या उद्योजिका व घरगीती महिला उद्योजिकांसाठी आर्टीफिसिअल इंटेलिजन्स या अत्याधुनिक तंत्रज्ञांच्या मदतीने एक व्यासपीठ निर्माण केले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने छोट्या व घरगुती व्यवसायांमध्ये कशी वृद्धि होईल व हे व्यवसाय कसे सुलभरीत्या करता येतील याकडे लक्ष देण्यात आले आहे.
‘पुला’ हा सोनिया कोंजेटी यांनी सुरु केलेला पुण्यातील जवळपास अडीच लाख महिलांचा समूह आहे. या समूहात घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला व अनेक छोटे व्यवसाय करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. पुला च्या माध्यमातून अनेक महिलांनी आपला व्यवसाय सुरु करून तो मोठ्या प्रमाणात वाढवला देखील आहे. अशाच उद्योजिका महिलांसाठी पुला ने ‘पुला बाजार प्लस’ नावाचे नवीन व्यासपीठ तयार केले आहे यात सर्व पुला विक्रेते आणि सेवा प्रदात्यांना आपल्या व्यवसायाचे व्यवस्थापन व आयोजन करण्यास याचा फायदा मिळणार आहे. हे ॲप उद्योजिकांना ग्राहकांकडून मिळालेल्या ऑर्डर व्यवस्थापन, पेमेंट, त्याची डिलिव्हरी, वेळापत्रक, सूची व यादी इ. अश्या अनेक सेवा देण्यास उद्योजिकांना मदत करणार आहे.
‘पुला बाजार प्लस’ मध्ये आर्टीफिसिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंगचा वापर करण्यात आला आहे. तसेच फेसबुक एपीआय ची अधिकृत मंजूर देखील घेण्यात आलेली आहे. या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा पुलाच्या फेसबुक ग्रुपवर आलेल्या लीड्स उद्योजिकांना त्यांच्या व्यवसाया प्रमाणे वर्गीकृत होतील व त्या ग्राहकांशी संपर्क साधने सोईचे होईल.
या वेळी सोनिया कोंजेटी म्हणाल्या कि, “आम्हाला पुण्याच्या प्रत्येक महिलेला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवायचे आहे. जेणे करून प्रत्येक महिला आपल्या पायावर उभी राहील. व आपला व्यवसाय जास्तीत जास्त प्रमाणात वाढवेल. आम्ही पुण्यातील महिलांचा एक मोठा व दिवसेंदिवस वाढत चाललेला समूह आहोत यातील उद्योजिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी सर्वोत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.” त्या पुढे म्हणाल्या की, “महिला उद्योजकांना मदत करणे आणि सक्षम बनविणे हे पुलाचे मुख्य उद्दीष्ट आहे आणि हे व्यासपीठ लघुउद्योग आणि गृहउद्योग आधारित महिला उद्योजकांसाठी आहे.”
‘पुला बाजार प्लस’ कोणत्याही प्रकारच्या लघुउद्योग आणि गृहउद्योग चालविणाऱ्या महिलांसाठी आहे. यात विक्रेत्याला त्याच्या मालाची यादी, साठा व तसेच उत्पादनांचा आकार आणि रंग इत्यादीत फरक व्यवस्थापित करण्यास मदत करते. त्याच बरोबर ग्राहकांकडून आलेल्या ऑर्डर चे व्यवस्थापन, त्याची डिलिव्हरी करणे व ग्राहकाकडून पेमेंट घेणे यांसारख्या अनेक सुविधा यामध्ये विक्रेत्याला मिळतात.
हे व्यासपीठ महिला व्यावसायिकांना ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुलभ करते. मुख्य म्हणजे विक्रेत्यांना त्यांची विक्री प्रक्रिया पुढे नेण्यास व वाढवण्यास मदत करते.