पुणे, सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या शतकोत्तर-सुवर्ण महोत्सवी वर्षाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. 150 व्या वर्षात पर्दापण केलेल्या या शाळेने आपला 150 व्या वर्षाच्या लोगोचेही या निमित्ताने अनावरण केले.
सेंट झेव्हियर्स चर्चमध्ये शतकोत्तर-सुवर्ण महोत्सवी वर्षाची प्रार्थना करून आणि बिशप्स्च्या आशिर्वादाने याचा आरंभ करण्यात आला. पुण्याचे बिशप्स् थॉमस डाबरे, पुणे प्रोव्हेन्शिअल्स् भाऊसाहेब संसारे, बिशप व्हॅलेरीय डिसुझा, शाळेचे माजी विद्यार्थी व रूबी हॉल क्लिनिकचे डॉ.परवेझ ग्रँट, शाळेचे माजी व्हिन्सेटीयन फा.जॉर्ज केलिथ व फादर मारीओ फर्नांडिस यांचा यावेळी सेंट व्हिन्सेंट हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर अॅन्ड्रु फर्नांडिस, उपमुख्याध्यापक अनिश के. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, वर्गशिक्षक, कर्मचारी, शाळेच्या पॅरन्टस् टिचर असोसिएशन (पीटीए) व व्हिन्सेटीयन ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) संघटनेचे पदाधिकारी असे सुमारे 2 हजार लोक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात सेंट व्हिन्सेंट स्कूलच्या प्रांगणात झाली. 150 व्या वर्षानिमित्त शाळेचा लोगोचे अनावरण करण्यात आले. पुणे प्रोव्हिन्स् सोसायटी ऑफ जिजसचे फा.भाऊसाहेब संसारे यांनी प्रार्थना केली आणि सदिच्छा दिल्या. यानंतर शाळेपासून ते सेंट झेवियर्स चर्चपर्यंत शाळेतील मुलांनी संचलन केले.
सेंट झेवियर्स चर्चमध्ये उपस्थित सुमारे 55 पाळक (प्रिस्ट) यांनी शाळेच्यावतीने प्रार्थना केली व शाळेच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. माजी विद्यार्थी व 31 वर्षांपासून असलेले पुण्याचे बिशप्स् व्हाल्वेरीअन डिसुझा यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. उत्तम मन आणि सहृदय निर्माण करणे, हाच शिक्षणाचा मुख्य गाभा आहे. हे सुत्र धरून शाळेने आत्तापर्यंत केलेली वाटचाल वाखाणण्याजोगी आहे. केवळ आपल्यासाठी न जगता इतरांसाठी जगून आपले जीवन सार्थक करा, अशी शिकवण त्यांनी यावेळी दिली.
कला प्रदर्शन, कॉफी टेबल पुस्तक प्रकाशन, आंतरशालेय कॅरोल वाचन सादरीकरण स्पर्धा, मॅरथॉन, आंतरशालेय मैदानी स्पर्धा, फुटबॉल आणि बास्केटबॉल स्पर्धा, आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा, वर्गशिक्षिका परिषद अशा भरगच्च कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करून आम्ही शतकोत्तर-सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करणार आहोत, असे सेंट व्हिन्सेंट हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर अॅन्ड्रु फर्नांडिस यांनी सांगितले.
शाळेच्या सभागृहामध्ये 1 ऑक्टोबर रोजी निमंत्रित मान्यवरांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केला जाणार असून 2 ऑक्टोबर रोजी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठीही मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. या मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी विशेष उपस्थिती असणार आहे.