पुणे : हडपसर – सासवड मार्गावर ऊरुळी देवाची (ता. हवेली ) हद्दीतील राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी (ता. 09) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यात चार कामगार राजस्थानी असुन एक जण लातुर जिल्हातील रहिवाशी आहे. दुकान मालकाने,किंवा चालकाने चोरी होऊ नये या भितीने दुकानाच्या शटरला बाहेरुन कुलूप लावण्याने, आग लागल्याची चाहुल होऊनही, दुकानाच्या बाहेर न पडता आल्याने पाचही कामगाराचा होरपळुन मृत्यु झाला. या आगीत कापड दुकानाची सुमारे तीन कोटी रुपयांची आर्थिक हानी झाल्याचा अंदाज आहे.
राजयोग होलसेल साडी या कापड दुकानाच्या गोदामाला लागलेल्या आगीत राकेश सुखदेवजी रियाड (वय-22 रा.ग्राम दासास तालुका रियाबडी, जिल्हा नागोर, राजस्थान) धिरज ओमप्रकाश चांडक (वय- 25 रा. गाधवड जि. लातुर) राकेश बुगारम मेघवाल (वय -20) व धर्मराज तुकाराम बडियासर (वय- 25 रा. दोघेही ग्राममेवडा, ता. देगाना, जि. नागोर, राजस्थान) सूरज परूजी शर्मा (वय-२५ रा. भडायली ता. रियाबडि जि. नागोर, राजस्थान) या पाच जनांचा मृत्यू झाला आहे. दुकानमालक राजीव रामदास भाडळे (वय- 35, रा. उरुळी देवाची ता. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी घटनेची चौकशी सुरु केली आहे.
सुरेश जाखड यांनी घटनेची माहिती दुकान मालक निखील भाडळे यांना कळवली. यादरम्यान दुकानाला लागलेली आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने, शेजारचे लोकही दुकानाभोवती जमा झाले. आगीने रौद्र रूप धारण केले होते. बाहेरून कुलूप काढल्यानंतर कपडा असल्याने आगीने जोरात पेट घेतला. दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडण्यात आल्या. मागून भिंत तोडण्यात आली. यातील कामगारांना वाचवण्यात यश आले नाही. आत अडकलेल्या पाचही कामगारांनी स्वतःला वाचविण्यासाठी बाहेर पडण्याच्या उद्देशाने दुकानाच्या हाती लागतील त्या खिडक्या वाकविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना बाहेर पडता आले नाही. दुकानात कपड्यांनी पेट घेतल्याने, पाचही जण होरपळुन मृत्युमुखी पडले.
दरम्यान घटनेची माहीती लोणी काळभोर पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी आगीची माहिती अग्निशामक दलाला देताच, पंधऱा मिनीटाच्या आत अग्निशामक दलाच्या तातडीने 5 गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुमारे तास भराच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. मात्र याच पाच जनांना आपला जीव मात्र गमवावा लागला.
या पाच कामगारांच्या मृत्युस दुकान मालकाचा/चालकाचा निष्काळजीपणा कारणीभुत ठरलल्याचे चौकषीत निष्पन्न होतो आहे त्यामुळे दुकानमालक/चालक व त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास मागेपुढे पहाणार नाही असे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी सांगितले आहे.
हडपसर – सासवड मार्गावर ऊरुळी देवाची व वडकी गावच्या हद्दीत राजयोग साडी डेपो सारखी शंभरहुन अधिक कापड दुकाने आहेत. उरुळी देवाची, फुरसुंगी व वडकी परीसरातील स्थानिक युवकांनी सुरतसह गुजरात राज्यातील कापड व्यावसायिकांना हाताशी धरुन, व संबधितांना भागीदारीत घेऊन कापड दुकाने थाटली आहेत. मात्र या परीसरातील एकाही दुकानात आग प्रतिबंधक यंत्रणा अथवा उपाय योजना केलेल्या नाहीत. राजयोग साडी डेपोला लागलेल्या आगीवरुन वरील बाब पुढे आली आहे.