प्रती ,
मा कुणालकुमार,
आयुक्त,पुणे मनपा.
विषय – कै यशवंतराव थरकुडे दवाखाना एरंडवणे येथील भेटीत अनेक धक्कादायक बाबी उघड…त्वरित कारवाई / कार्यवाही करावी ….
मा महोदय,
आज सकाळी मी माझ्या प्रभागातील एरंडवणा येथील कै यशवंतराव थरकुडे दवाखाना येथे पाहणी करण्यासाठी व नागरिकांची भेट घेउन त्यांच्या समस्या समजावुन घेण्यासाठी भेट दिली असता अत्यंत धक्कादायक बाबी उघड झाल्या. त्यातील काही महत्त्वाचे विषय खालीलप्रमाणे –
१) येथे दातांवरील उपचारासाठीचे मशीन बसवुन तब्बल आठ महिने झाले असून केवळ पाण्याचे कनेकशन नसल्याने सदर मशीन चा कोणताही उपयोग होत नसून सदर उपकरण विनावापर पडून आहे.दंतचिकित्सा विभागाचे डॉक्टर येथे केवळ रुग्णांच्या तपासणी साठी / कंसल्टेशन साठी येतात.अशीच अवस्था सोनोग्राफी आणि डोळ्यांच्या विभागाची असून येथे उपचार सुरु आहेत मात्र येथे ही पुरेसे पाणी कनेक्शन नसल्याचे आढळून आले.
२) दवाखान्याच्या तळमजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीस झाकण नसून ते वारंवार चोरीस जात असल्याचे समजते.हे आरोग्याच्या दृष्टीने किती धोकादायक आहे हे सांगणे न लगे.
३) दवाखान्याच्या मुख्य दरवाजा तुटलेल्या अवस्थेत असून त्यामुळे सायंकाळनंतर येथे असामाजिक तत्वांचा वावर असतो.
४) नुकतेच या रस्त्यावर झालेल्या कामाचा राडारोडा दवाखाना परिसरात पडला असून त्यामुळे येथील आवारास अवकळा आली आहे.
५) येथील वरच्या मजल्यांचे बांधकाम ही अपूर्ण अवस्थेत असून त्याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे जाणवते.
मुख्य खात्याना वारंवार लेखी कळवून ही येथे सुधारणा झाल्या नाहीत असे समजते.तरी आपण याची उच्च पातळीवर चौकशी करुन हलगर्जीपणा करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी आणि सर्व व्यवस्था ठाकठीक होइल यासाठी संबंधित खात्याना आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी करत आहे.
आपली,
सौ मंजुश्री संदीप खर्डेकर.
नगरसेविका प्रभाग १३ .
सदस्य महिला व बाल कल्याण समिती.
मो ९८९०४०५९९९