पुणे : गतवर्षी एकाच दिवशी दोन कोटी पेक्षा अधिक वृक्ष लागवड करून आपण उच्चांक प्रस्थापित केला. यावर्षी 4 कोटीचे उद्दिष्ट आपण सप्ताहाभरात निश्चित पूर्ण करू, असा विश्वास वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यंदा 1 ते 7 जुलै 2017 दरम्यान राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ठिकठिकाणी आढावा बैठक घेऊन लोकांमध्ये जनजागृती करीत आहेत.
पुणे विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत, आमदार, जि.प.अध्यक्ष, नगराध्यक्ष, सभापती, सरपंच आदी उपस्थित होते. वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी पुणे,सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा जिल्हानिहाय आढावा घेतल्यानंतर वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या सूचना ऐकून घेतल्या. आपल्या नाविन्यपूर्ण सूचनांची राज्यस्तरावर दखल घेतली जाईल, असे सांगून ते पुढे म्हणाले, आजच्या बैठकीला लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. चांगल्या सूचना करीत आहेत, याचा आनंद होत आहे. झाडाला जगविणे कठीण आहे, त्यापेक्षा आता जगणे अतिशय कठीण होणार आहे. आपल्या पूर्वजांनी वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वनक्षेत्र कमी कमी होत गेले. आता 20 टक्क्यावरुन 33 टक्क्यापर्यंत वनक्षेत्र वाढविण्याचा संकल्प केला आहे.
वृक्ष लावणाऱ्या हातांची संख्या वाढवावयाची असून, वृक्षप्रेमी लोकांची फौज तयार करावयाची आहे, असे सांगून ते म्हणाले, त्यासाठी लोकजागर, शास्त्रशुध्द नियोजन करावे लागेल. त्यासाठी लोकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पुढील वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करावयाची आहे. बांबू हा कल्पवृक्ष आहे. अन्य वृक्षांचे गुणधर्म देखील आपण लोकांना पटवून दिले पाहिजेत. वृक्ष लागवडी बरोबरच त्याचे संगोपन देखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी विभागाला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, जलयुक्त शिवार व वृक्ष लागवड या दोन्ही योजना एकमेकांना पूरक आहेत, असे सांगितले. यावेळी लोकप्रतिनिधींनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) श्री भगवान, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण अनुराग चौधरी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण डॉ. दिनेशचंद्र त्यागी, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे विवेक खांडेकर, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदि उपस्थित होते.
प्रारंभी संत तुकाराम वनग्राम योजने अंतर्गत पुणे जिल्हा स्तरावरील पुरस्काराचे वितरण करण्यात आले. वनसंरक्षण समिती घेरासिंहगड यांना प्रथम, तर वन संरक्षण समिती सांडभोरवाडी, खेड यांना द्वितीय क्रमांकाचे अनुक्रमे 51 हजार व 31 हजार रुपयांचे पारितोषिक वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.