पुणे-कोरेगाव-भीमा प्रकरणातील संभाजी भिडे गुरुजींवरील खोटे आरोप मागे घेण्यासाठी उद्या पुण्यात श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
संभाजी भिडे गुरुजींवरील खोटे आरोप मागे घेण्यासाठी उद्या पुण्यात श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. शनिवारवाडा येथून सकाळी साडेदहा वाजता हा मोर्चा सुरु होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हाधिका-यांना निवेदन दिल्यानंतर या मोर्चाची सांगता होणार आहे.
मात्र या मोर्चाला परवानगी देण्यात येऊ नये असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त लाखो लोकांच्या जनमुदायावर मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी हल्ला करून दंगल घडवून आणली होती. समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करून जाती जातीमध्ये विष पसरविण्याचे काम समस्त हिंदू आघाडी आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी केले आहे. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ बुधवारी (दि. 28) पुण्यात निघणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे आणि संघटक मोनिका निंबाळकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.