पुणे- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे महामंडळाचे तीन पदाधिकारी राजकारण करीत असून साहित्य महामंडळातील राजकारणाचा बुरखा आपण पुस्तक लिहीन फाडणार असे सांगत येथे आज संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी गुरुवारी महामंडळावर जोरदार टीका केली महामंडळ हे असहिष्णू व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापणे, त्यात काही मुद्दे आक्षेपार्ह आहेत असे सांगणे हा त्याचाच भाग आहे. पण महामंडळाला अशा ‘सेन्सॉरशिप’चा अधिकार नेमका दिला असा सवाल डॉ. श्रीपाल सबनीस यांनीकेला
पिंपरी-चिंचवडमध्ये नुकतेच साहित्य संमेलन पार पडले. संमेलनात संमेलनाध्यक्षांची भूमिका मांडणारे भाषणच यंदा साहित्य महामंडळाने छापूनही वाटले नाही त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत वाद गाजत राहिले. साहित्य महामंडळाने सबनीस यांची जास्तीत जास्त गोची कशी करता येईल याचे प्रयत्न केल्याचे बोलले गेले. अखेर सबनीस यांनी साहित्य संमेलन पार पडताच महामंडळाच्या काही पदाधिका-यावर सडकून टीका केली.
सबनीस म्हणाले, कोणत्याही साहित्य संमेलनाचे मुख्य आकर्षण हे अध्यक्षांचे भाषण असते. अध्यक्षांचे भाषण छापुन ते साहित्य संमेलनात वितरित करणे ही महामंडळाची जबाबदारी असते. मात्र, यंदा असे घडले नाही. माझे भाषण छापूनही ते वाटलेच गेले नाही. यामागे महामंडळाचे तीन पदाधिकारी राजकारण करीत होते. या भाषणात काही मुद्दे आक्षेपार्ह आहेत असे त्यांचे म्हणणे होते. संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापणे, त्यात काही मुद्दे आक्षेपार्ह आहेत असे सांगणे म्हणजे महामंडळाचे हे असहिष्णूपणाचेच वागणे आहे. महामंडळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे की विरोधात हे महामंडळाने एकदाचे सांगून टाकावे. महामंडळाला अशा सेन्सारशिपचा अधिकार कोणी दिला. संमेलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझे छापील भाषण रसिकांना मिळू न देणे ही माझी, माझ्या विचाराची व पर्यायाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे अशा शब्दांत सबनीस यांनी महामंडळावर सडकून टीका केली.
साहित्य संमेलन, त्याआधी संमेलनाध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक व यादरम्यान आलेल्या अनुभवावर आपण लवकरच पुस्तक रूपाने भाष्य करणार असल्याचे सांगत सबनीस म्हणाले, संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून संमेलनाच्या समारोपापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली. वेगवेगळे वाद तयार केले गेले. राजकीय व्यक्तींसोबत साहित्य क्षेत्रातील मंडळींनीही राजकारण कसे केले हे सगळे अनुभव शब्दबद्ध करणार आहे. ‘अध्यक्षाची आत्मकथा’ असे शीर्षक असलेल्या पुस्तकाद्वारे संमेलनाच्या निमित्ताने झालेल्या पडद्यामागील सर्व घडामोडींवर रसिक व वाचकांसमोर आणणार आहे. महामंडळाच्या दोन पदाधिका-यांनी विठ्ठल वाघ यांना, तर एकाने अरुण जाखडे यांना जाहीर पाठिंबा दिला. पदाधिकाऱ्यांनी असा पाठिंबा देणे योग्य आहे का? इथपासून “मॉर्निंग वॉक‘ला चला, अशा शब्दांत मला आलेली धमकी, गाढवावरून निघालेली धिंड…अशा अनेक घटनांमागील राजकारण मी शब्दबद्ध करणार आहे. अशा वेगवेगळ्या घटना घडल्या असल्या तरी स्वागताध्यक्ष या नात्याने डॉ. पी. डी. पाटील माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याचे मी पुस्तकात नमूद करणार आहे. अध्यक्षांची आत्मकथा हे पुस्तक लिहून मी अनेकांचा बुरखा फाडणार आहे असेही सबनीस यांनी सांगितले.