‘माय डिअर गच्ची, लहानपणापासून पतंग उडवायला आणि चांदणं बघायला मी गच्चीवर यायचे.’ गच्ची सिनेमातील प्रिया बापटचे हे वाक्य आणि हा सिनेमाही गच्चीबद्दल खूप काही सांगून जातो. चाळ-बिल्डिंग संस्कृतीत ज्यांचा जन्म झाला आला आहे त्यांना नक्कीच हे पटेल, कारण त्यांनी हे अनुभवलं असणार. दादरला आमच्या ‘ए’ विंगच्या बिल्डिंगला चौथ्या मजल्यावरती मोठी गच्ची होती. संक्रांत जवळ आली की त्या गच्चीत आम्ही पतंग उडवायला जात असू. ती गच्ची उंचावर आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये असल्या कारणाने आजी पाठवायची नाही. फक्त पतंगीच्या सिझनला सूट असायची कारण तेव्हा आमच्याबरोबर घरातील कोणीतरी मोठी माणसे बरोबर असायची.
आमच्या ‘सी’ विंगला काही गच्ची नव्हती, याचं खूप वाईट वाटायचं. पण बाजूला माझ्या आजोळी म्हणजे’इलम महाल’ बिल्डिंगला मात्र प्रत्येक माळ्यावर गच्ची होती, मला याचं खूपच अप्रूप होतं. आमच्या घराची खिडकी आणि बाजूच्या बिल्डिंगची गच्ची समोरासमोर होती. खिडकीतून मी त्या गच्चीतल्या गमतीजमती अनुभवायचे. सकाळी काही मंडळी पेपर वाचायला यायचे, तर काही कोवळी उन्हं अंगावर घ्यायला. अकरानंतर उन्हं आली की वाळवणं किंवा कपडे सुकत घातले जायचे. संध्याकाळी मुले खेळत असायची, तर कुणी अभ्यासही करत असायचे. रात्री बरेच जण गच्चीत आकाशातील तारे बघत शांत झोपायचे. माझे आजोबा (आईचे वडील) सकाळी आणि संध्याकाळी नेमाने आमची चौकशी करायला गच्चीत येऊन आम्हाला हाक मारायचे. हा त्यांचा नेम ते हयात असेपर्यंत कधीही चुकल्याचे मला तरी आठवत नाही. आमच्या घरी किंवा आईच्या माहेरी काही खास पदार्थ केला की त्याची देवाणघेवाण काठीला पिशवीत डबा घालून व्हायची (आमची खिडकी आणि आजोबांची गच्ची यातील अंतर इतके कमी होते!). आम्ही बहीण-भाऊही गच्चीत खेळण्यासाठी जात असू. मे महिन्याच्या सुट्टीत खास करून…कारण आजी आम्हाला खिडकीतून पाहू शकत होती; त्यामुळे तीही आजोळी खेळायला पाठवायची. मी,नीतामावशी, भावनामावशी आणि त्यांच्या मैत्रिणी खूप खेळायचो. रात्री झोपायला सुद्धा मी जायचे. कारण गच्चीत झोपायला मिळणार म्हणून. चिक्कार गप्पा मारायचो आणि खिदळायचो. मग आजोबा चिडायचे आणि म्हणायचे, “किती हसता तुम्ही फिदीफिदी. झोपा आता. आजूबाजूला लोक झोपलेत…त्यांची झोप मोडायची.” चांदणं बघत बघत कधी शांत झोप लागायची ते कळायचंही नाही. (गच्चीतल्या चांदण्या रात्रीचा अनुभव आम्ही गेल्या वर्षी तबला कार्यशाळेतील मुलांना दिला. गच्चीत बसून गप्पा मारणे, चांदणे अनुभवत शांत झोपणे यातील मजा बोर्डीला जयेशभाईंच्या बंगल्यातल्या गच्चीवर मुलांनी अनुभवली.)
दहा बाय दहाच्या खोल्या, त्यात माणसं मात्र खोलीच्या आकारमानापेक्षा जास्त. मग अशावेळी ही गच्ची खूपच जवळची आणि आपली वाटायची. घरात काही प्रसंग किंवा कार्य असले की गच्चीत मांडव घालून ते पार पडायचे. हा अनुभव गच्चीचा सहवास अनुभवलेल्या सर्वांचाच असेल. घरात काही भांडण झालं तरी मनसोक्त रडण्यासाठीही गच्चीचा कोपराच जवळचा वाटायचा. जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी ही गच्ची सगळ्यांना जवळची वाटायची.
कालांतराने चाळ संस्कृती जाऊन मोठमोठे टोलेजंग टॉवर बांधले जाऊ लागले. गच्चीचे आधुनिक बारसे झाले ‘टेरेस’! हा टेरेस आता सर्वांत वरती. त्याचा उपयोगही मोठाल्या पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी,डिश अँटेना बसविण्यासाठी होऊ लागला. कधी तरी थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन होऊ लागले. त्या टेरेसला गच्चीची सर मात्र नाही. मन मोकळं करून, मनसोक्त रडून पुढं लढायला उभं करणारी गच्ची…या टेरेसचा उपयोग मात्र हताश झालेल्या मनाला आत्महत्या करण्यासाठी म्हणून काहींनी करून घेतला. अशा प्रसंगाने टेरेसबद्दल आपुलकी वाटण्यापेक्षा भय जास्त वाटू लागले. टेरेसशी आपलेपणाचे नाते नाही जोडले गेले. गच्ची ती गच्चीच…
‘से द बँड’चे गच्ची वरून… हे गाणे खासच आहे, गच्चीच्या सहवासाचे आणि आठवणींचे. ते गाणे ऐकले की मन परत गच्चीची सफर करून येतं आणि ताजंतवानं होतं. आहेच मुळात ही गच्ची जवळची!
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068