पुणे- समाजापासून बाजूला राहिलेल्या उपेक्षित आदिवासी समाजाला आपल्या सेवाभावी कार्यातून वैद्यकीय,
शैक्षणिक, आर्थिक सुविधा उपलब्ध करून देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करून श्रीमती
सुनंदाताई पटवर्धन यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे, असे गौरोद्गार पुण्याच्या महापौर
मुक्ता टिळक यांनी काढले.
‘शारदा शक्ती’ महाराष्ट्र प्रांताच्या वतीने ‘शक्तिस्थापना दिवस’ रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन
केंद्र, डेक्कन कॉर्नर, कर्वे रस्ता, पुणे येथे संपन्न झाला. जव्हार येथील वयाच्या ८० व्या वर्षी देखील कार्यरत
असणार्या प्रगती प्रतिष्ठानच्या श्रीमती सुनंदा पटवर्धन यांना त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक सेवेबद्दल व
रचनात्मक कार्याबद्दल ’शक्तिप्रेरणा’ पुरस्काराने यावेळी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सन्मानित
करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असतानाही जिद्दीने
शिक्षण घेणार्या पुरंदर तालुक्यातील पिंगारी गावच्या कु. मानसी अरविंद ताकवले हिला ‘आयशक्ति’
पुरस्कार व ५ हजार रुपये रोख देऊन यावेळी गौरविण्यात आले. विज्ञान भारतीचे संघटन सचिव जयंत
सहस्त्रबुद्धे, मिनिलेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्षा व कार्यकारी संचालिका स्मिता घैसास,
शक्तीच्या राष्ट्रीय सचिव डॉ. लीना बावडेकर, शारदा शक्तीच्या अध्यक्षा डॉ. राजश्री कशाळकर व सचिव
डॉ. प्रियंवदा हेर्लेकर आदी यावेळी उपस्थित होते.
मुक्ता टिळक, सुनंदाताई पटवर्धन यांच्या भाषणाचा संदर्भ देत म्हणाल्या, आपण मागासवर्गीय,
सामाजिक न्यायाबाबत नेहेमी चर्चा करतो परंतु आदिवासी समाजाचे जीवन हे क्रांतिकारी विचारांचे
असल्याचे आपल्या लक्षात येते. त्यामुळे त्यांना मागासलेले म्हणायचे का असा प्रश्न पडतो. सुनंदाताईंनी
आदिवासी समाजाला एकत्र आणण्याचे एकमेव उद्दिष्ट ठेवले. त्यांच्यासाठी शिक्षणाचा पाया घातला.
विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देत त्यांच्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या व त्यांना समाजाच्या
मुख्य प्रवाहात आणले. शहरातील जनतेचे जीवन हे फार सुरक्षित आहे. आदिवासी समाजाचे प्रश्न समजून
घेण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव घेतले पाहिजेत. हे अनुभव विशेषत: तरुणांना दिले पाहिजे असे सांगून म्हणाल्या
उस तोडणी कामगार, तमाशा कलावंत अशा वेगवेगळ्या घटकांचे विविध प्रश्न आहेत. मी समाजाचे
काहीतरी देणे लागतो ही भावना आणि प्रेरणा तरुण पिढीला मिळाली तर त्यातून अनेक सुनंदा ताई तयार
होतील आणि एका सशक्त समाजाची निर्मिती होईल असे त्यांनी सांगितले.
जयंत सहस्त्रबुद्धे म्हणाले, जगात विज्ञानाचा बोलबाला झाला. आपल्या देशातही विज्ञान विकसित झाले.
विज्ञानाने महिलांकडे, महिलांच्या प्रश्नाकडे बघण्याची दृष्टी दिली. त्यातून काही चांगल्या गोष्टीही घडल्या
परंतु आपल्या देशासाठी अनुकूल, अनुरूप नसलेल्या गोष्टीही मिळाल्या. आपल्या देशात महिला व
महिलांचे प्रश्न कसे आहेत, ते कसे सोडवले पाहिजेत याचा विचार विज्ञान भारतीच्या माध्यमातून केला
गेला आणि त्यातून ‘शक्ती’ची निर्मिती झाली. महिलांचा बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास
व्हावा ही ‘शक्ती’ची कल्पना आहे. समाजामध्ये अनेक महिला स्वत: मोठे होऊन समाजाला मोठे करतात
त्यातून ‘शक्तीप्रेरणा’ पुरस्काराची कल्पना आली. सुनंदाताईंकडून प्रेरणा घेऊन अशा पद्धतीने आपले
जीवन चालवता येईल का असा विचार करून समाजाला उपयोगी पडेल असे जीवन जगण्यासाठी सर्वांनी
प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.
सुनंदाताई सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या आदिवासी भागात
मी काम करते. तिथल्या महिलांचे जीवन आणि आपल्याकडील महिलांचे जीवन हे पूर्णत: वेगळे आहे.
आदिवासी समाजात मुलगा- मुलगी असा भेद केला जात नाही, दोघांनाही कुटुंबात व समाजात समानतेने
वाढवले जाते. गावातील दोन तरुण जीवांचे लग्न लावण्याचा मान गावातील विधवेला दिला जातो. ती
कष्टकरी, अत्यंत सामान्य असली तरी तिला हा मान दिला जातो. आदिवासी समाजात लग्न लवकर
होतात. मुलगी शिकलेली नसली तरी तिला माणुसकीची शिकवण दिली जाते. तिला सासरी त्रास दिला
जात असल्यास ती स्वत: माहेरी निघून जाते व आई-वडिलांवर आपला भार न टाकता स्वत: कष्ट करते.
ती तिची तक्रार गावापुढे मांडते. आपण हुंडाबळीच्या बातम्या ऐकतो. आदिवासी समाजात हुंडा तर सोडाच
परंतु मुलीचे पालनपोषण केल्याच्या बदल्यात मुलाकडून मुलीच्या आईवडिलांना धान्य दिले जाते. अज्ञान
आणि वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे ते लोक भगताकडे जातात. ती त्यांची अंधश्रद्धा नव्हे तर
वस्तुस्थितीला सामोरे जाण्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून हे लोक भगाताकडे जातात, या भागात
वैद्यकीय सुविधा आम्ही निर्माण केल्या तसे भक्त कमी झाले असे त्यांनी सांगितले. या भागात शैक्षणिक
सुविधा, सौर ऊर्जेद्वारे विद्युत सुविधा, पाण्याच्या सुविधा त्यातून शेतीचा रोजगार कसा निर्माण झाला
याबाबत सुनंदाताईंनी सविस्तर माहिती दिली.
सौ. स्मिता घैसास आणि कु. मानसी ताकवले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यंदाच्या शक्तिप्रेरणा पुरस्काराच्या मानकरी श्रीमती सुनंदा पटवर्धन या मूळच्या सातारा जिल्ह्यातील
वाईच्या. वयाच्या १० व्या वर्षी कृष्णा नदीत बुडणार्या एका लहान मुलाचे प्राण वाचविण्याचे धाडस
त्यांनी दाखवले. वयाच्या २८व्या वर्षी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील भोसला मिलिटरी शाळेतून सैनिकी
शिक्षण घेतले. पुण्यातील हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेकरिता भाऊबीज जमा करण्याचे कार्य त्यांनी कित्येक
वर्ष केले. वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा तालुक्यामध्ये साप्ताहिक फिरते हॉस्पिटल सुरू केले. ठाणे
जिल्ह्यातील झोपडीधारकांना वीज, पाणी, शौचालये बांधून देऊन स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याकरिता
पुढाकार घेतला. दिव्यांग व महिला यांच्या उद्धाराकरिता त्यांनी स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्ष म्हणून
विशेष कार्य केले. पाणी अडवा – पाणी जिरवा मोहीम राबवून ७५० एकर पडीक जमिनीतून दुबार पीक
घेऊन शेतकर्यांना स्वावलंबी बनविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. लीना बावडेकर यांनी केले, सूत्रसंचालन सौ. सीमंतीनी वझे व सौ.
मनीषा कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. राजश्री कशाळकर यांनी मानले.