-
पुणे महापालिकेचा पहिला संतशिरोमणी संताजी महाराज जगनाडे पुरस्कार उल्हास पवार यांना प्रदान
पुणे – गेल्या काही वर्षात समाजातील जातीयवाद, विषमता वाढत आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांसारख्या महापुरूषांना जातीपातील विभागून घेतले आहे. आता संतांनाही जातीत विभागण्याचे काम सुरू आहे. संतांना जातीत विभागण्याऐवजी अधुनिकतेच्या जगात संतांची वैश्विक मानवतेची संकल्पना मांडण्याची गरज असून ती संकल्पना आपण सगळे समाजापुढे, नव्या पिढीसमोर, मांडू या असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वारकरी संप्रदायातील उल्हास पवार यांनी आज येथे केले.
पुणे महापालिकेच्यावतीने देण्यात येणारा संतशिरोमणी संताजी महाराज जगनाडे पुरस्कार आज उल्हास पवार यांनी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना उल्हास पवार यांनी हे आवाहन केले. संताजी महाराज जगनाडे यांच्या नावाने पुरस्कार देणारी पुणे महापालिका ही पहिलीच महापालिका असून मानपत्र, स्मृती चिन्हं, शाल आणि १,११,१११ रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार यांच्या पत्नी अनुराधा पवार, नगरसेविका लक्ष्मीबाई घोडके, तळेगाव दाभाडेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सदुंबरे तीळवण तेली समाजाचे अध्यक्ष जनार्दन जगनाडे, माजी अध्यक्ष प्रकाश कर्डिले, प्रिया मेहेंद्रे आणि जयश्री बागूल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
उल्हास पवार म्हणाले, पुणे म्युनसिपाटली ते महानगरपालिका अशी १५० व्या वर्षाकडे जाणारी परंपरा असलेल्या पुणे महापालिकेच्या वतीने मला हा पुरस्कार देण्यात येत आहे. ज्या सभागृहात महात्मा गांधींना दोनदा मानपत्र देण्यात आले, महात्मा फुले, आचार्य अत्रे, ना. ग. गोरे यांच्यासारखे अनेक मान्यवर ज्या सभागृहाचे सदस्य होते त्या सभागृहात मला पुरस्कार मिळत असल्याचा मनस्वी आनंद आहे. ज्यांनी चारशे वर्षांपूर्वी तुकोबारायांना साथ देण्याचे धाडस दाखवणा-या त्या १४ सहका-यांपैकी अग्रणी असलेले संताजी महाराज जगनाडे यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळतोय याचीही मनस्वी आनंद आहे.
आपल्या सर्वच संतांनी क्रांतीकारक पावले उचलली. पण ती कोणा एका समाजासाठी किंवा जातीसाठी नव्हती तर सर्व समाजासाठी होती असे सांगून पवार म्हणाले, त्यामुळेच आजही ज्ञानोबा तुकोबांचा गजर झाला की सर्व संतांचा गरज झाल्यासारखे वारकरी संप्रदायात मानले जाते. कारण आपल्याकडे असलेल्या विविधतेत ऐक्य साधण्याचे काम संतानी केले. कोणालाही तुच्छ लेखू नको, कारण प्रत्येकाकडून काही ना काही चांगले घेण्यासारखे असते. तसेच श्रमाला प्रतिष्ठा देताना सर्वांना आदराने हाका मारण्याचे संस्कार आईवडिलांकडून मिळाले त्यामुळे आजपर्यंतची वाटचाल आपण सहजपणे करू शकलो. यावेळी त्यांनी वैकुंठवासी बाळासाहेब भारदे यांच्या उल्लेख आवर्जून केला आणि त्यांच्या सहवासामुळे वारकरी व भागवत संप्रदाय, साहित्य, कला सांस्कतिक क्षेत्रातील अनेक महानुभावांचा सहवास मिळाल्याचे नमूद केले.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, पुणे शहराच्या संस्कृतीकारणाशी उल्हास पवार यांचे नाव गेल्या २५ – ३० वर्षात एकरूप झाले आहे. तुकोबारायांनी अभंग रचू नयेत, रचले तर ते टिकू नयेत अशी त्या काळी काही लोकांची इच्छा होती. त्या अभंगाचे रक्षण करण्याचे काम संताजी महाराज जगनाडे व इतर सहका-यांनी केले त्यामुळे आज गाथेच्या रूपाने ते अभंग आपल्यापर्यंत पोचू शकले. त्या संताजी महाराजांच्या नावाचा पुरस्कार उल्हासदादांना दिला जातोय. राजकारणाचे अध्यात्मिकरण झाले पाहिजे ही असे महात्मा गांधींचे गुरू ना. गोपाळकृष्ण गोखले यांना वाटत होते. त्यांनी ते आचरणातही आणले. ही परंपरा पुढे महात्मा गांधी यांनी चालवताना त्यांच्या सहका-यांसाठी अशी चौकट निर्माण केली. राजकारणातील सचोटी, प्रामाणिकपणा म्हणजे अध्यात्मिकरण होय. हाच वारसा उल्हास पवार यांना बाळासाहेब भारदे यांच्याकडून मिळाल्याने राजकारणात असूनही ते चिखलातील कमळाप्रमाणे निष्कलंक आहे. राजकारणाबरोब, कलासक्त असूनही एकही आरोपाचा शिंतोडा उल्हास पवार यांच्यावर उडालेला नाही. आपल्याकडे अठरा पगड जातीजमाती हे वास्तव असून प्रत्येक जातीत संत होऊन गेले. प्रत्येक माणसाने संतासारखे होण्याचे धेय्य ठेवण्याची आज गरज आहे.
माजी मंत्री शिवरकर, आमदार शरद रणपिसे, महापौर प्रशांत जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी उपमहापौर आबा बागूल म्हणाले, समाजिक विषमतेच्या विरोधातील लढाईत तुकोबारायांना साथ देणा-या संताजी महाराज जगनाडे यांच्या नावाने पुरस्कार महापालिकने द्यावा यासाठी आपण तीन वर्षे प्रयत्न करत होतो. संताजी महाराज जगनाडे हे तुकोबारांच्या चौदा
टाळक-यांपैकी एवढीच त्यांची ओळख नाही तर “होतां संतु सखा म्हमून वाचली गाथा आणि कळला तुका” या ओळीवरून त्यांचे महत्व लक्षात येते. संताजी महाराज जगनाडे यांच्यानावाने पुरस्कार देणारी ही पहिली महापालिका असून राज्य सरकारनेही त्यांचे यथोचित स्मारक उभे करून त्यांच्या स्मृती जागवाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरूवात स्वागत गीताने झाले. प्रास्ताविक उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी तर आभार आबा बागूल यांनी मानले. सूत्रसंचलन घनश्याम सावंत यांनी केलेपुणे महापालिकेच्यावतीने देण्यात येणारा संताजी महाराज जगनाडे पुरस्कार उल्हास पवार यांना आज प्रदान करण्यात आला.