ट्वींकल’, ‘सिट्रस’ कंपन्यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा पुण्यात मोर्चा
पुणे-:राज्यात गुंतवणूकदारांच्या सुमारे 8 हजार कोटी गुंतवणूक गिळंकृत करून गाशा गुंडळणार्या ‘रॉयल ट्वींकल’, ‘सिट्रस’ या कंपन्यांच्या विरोधातील पैसे बुडविल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणार असल्याची माहिती आज सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली.
अधिक व्याजाचे आमिष दाखविणार्या ‘रॉयल ट्वींकल’, ‘सिट्रस’ या कंपन्यातील सामान्य गुंतवणूकदारांची 8 हजार कोटी गुंतवणूक बुडवून कंपनीने गाशा गुंडाळला आहे. पुण्यातील गुंतवणूकदारांनी आज मोर्चा काढून पोलीस आयुक्त आणि महसूल आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली.
‘रॉयल ट्वींकल’, ‘सिट्रस इन्व्हेंस्टर्स फोरम’ या नावाने गुंतवणूकदारांनी फोरम स्थापन केली आहे. या फोरमच्या राजश्री गाडगीळ, बापू पोतदार, भालचंद्र कुलकर्णी या निमंत्रकांनी निवेदन दिले. यावेळी आर. पी. गाडगीळ, एस. के. पोतदार, पी. एच. गांधी, वसंत प्रभुणे, धनश्री गाडगीळ, मुग्धा जोशी, संध्या चाफेकर, रुपा जोशी, अनिल प्रभुणे, वैदेही गोखले हे उपस्थित होते.
सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यानुसार संगमवाडी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात तक्रारी एकत्रित केल्या जाणार आहेत. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची, प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेतली जाणार आहे. दरम्यान, स्वारगेट पोलीस स्थानकात फोरमच्या वतीने पटवर्धन यांनी पहिली तक्रार दाखल केली.
महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांची भेट घेऊन शिष्टमंडहाने कारवाईची मागणी केली. कंपनीच्या 5 जिल्ह्यातील मालमत्ता विकल्या जाऊ नयेत. यासाठी जप्त कराव्यात, कंपनीचे ओमप्रकाश गोएंका यांचा पासपोर्ट जप्त करावा, त्यांनी नादारी जाहीर केल्यास फेटाळली जावी, अशा मागण्या शिष्टमंडळाने केल्या. पोलीस आयुक्तांशी बोलून आपण या प्रकरणातील कारवाईची दिशा निश्चित करू, असे आश्वासन चंद्रकांत दळवी यांनी दिले.