पुणे ः‘प्रथम डाव्या विचारसरणीचे असणारे मजरूह सुलतानपुरी नंतर काळानुसार बदलत गेल्यानेच प्रथितयश गीतकारांमध्ये सर्वाधिक लाँग इनिंग पूर्ण करणारे गीतकार म्हणून शेवटपर्यंत लिहिते राहिले’, असे मत प्राचार्य व संगीतकार कमलाकर परचुरे यांनी व्यक्त केले.
‘रसिक मित्र मंडळा’च्या वतीने आयोजित केलेल्या एक कवी -एक भाषा कार्यक्रमात ‘वारी’ प्रसिद्ध शायर व गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या विषयी परचुरे बोलत होते. नौशाद शकील बदायुनी, बेगम अख्तर तसेच मजरूह आदींशी परचुरे यांचे कौटुंबिक संबंध होते. त्यामुळेच परचुरे यांनी त्यांच्या विषयीच्या अनेक संस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. यावेळी अध्यक्षस्थानी अनिस चिश्ती, मंडळाचे संस्थापक सुरेशचंद्र सुरतवाला व गझलकार प्रदीप निफाडकर उपस्थित होते. हा कार्यक्रम पुणे श्रमिक पत्रकार संघ, गांजवे चौक येथे झाला.
मजरूह यांचे खरे नाव असरार अलद्रसन खान असे होते मजरूह म्हणजे घायाळ, जखमी, लहानपणी लोक त्यांना मजरूह नावाने संबोधित असत. त्यामुळेच चित्रपट गीत लेखनासाठी त्यांनी स्वतःचे नाव मजरूह असे ठेवून जन्म ठिकाण सुलतानपूर हे आडनाव घेतले, अशी माहिती परचुरे यांनी दिली.
1942 च्या शहाजहाँ या नौशाद यांच्या बरोबरच्या चित्रपटांपासून अगदी अलीकडच्या जतीन-ललित, आनंद मिलिंद पर्यंत मजरूह यांनी गीत- लेखन केले. साधी सोपी, हलकी फुलकी भाषा वापरल्याने मजरूह यांची गीते लोकप्रिय झाली. सुमारे 300 चित्रपटांमधून त्यांनी 3000 गाणी लिहिली. त्यांच्या या लोकप्रिय कारकीर्दीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला.
मजरूह हे प्रथम डाव्या विचारसरणीचे होते. त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लेखन केल्याने त्यांना दोन वर्षांचा तुरूंगवास ही झाला होता. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांचे खूप आर्थिक हाल झाले होते. तेव्हा राज कपूर यांनी ‘दुनिया बनानेवाले’ या गीताचे त्यांना 1000 रूपये मानधन त्यांच्या कुटुंबियांना दिले. कारण मजरूह यांनी त्या व्यतिरिक्तची मदतही नाकारली, असेही परचुरे म्हणाले. परचुरे यांनी यावेळी मजरूह यांची ‘गम दिये मुस्तकिल’, ‘जब दिल ही टूट गया’ आदी गीतांचे गायन ही केले.
अनिस चिश्ती म्हणाले, ‘चित्रपट गीतकार म्हणून त्यांच्याकडे इतके काम होते की , त्या व्यस्ततेमुळे त्यांचे बाकीचे लेखन खूपच कमी झाले. पण जे लिहिले ते दर्जेदार लिहिले. मजरूह, शकील, साहीर सारख्या आभिजात शायरांमुळे हिंदी चित्रपट पडले तरी त्यातील गाणी लोकप्रिय होत असत. त्याचे श्रेय या गीतकारांनाच जाते,’ असे मत ही अनीस चिश्ती यांनी व्यक्त केले.
‘साहित्य अकादमी’ने सन्मानित साहित्यिक व उर्दू कवी नझीर फतेपुरी व ‘आझम एज्युकेशन ट्रस्ट’चे माजी अध्यक्ष मुनव्वर पीरभॉय यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेशचंद्र सुरतवाला यांनी केले तर सूत्रसंचालन प्रदीप निफाडकर यांनी केले.