मुंबई – शिवसेनेला काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार अशी माहिती समोर आली आहे. परंतु, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी दिली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काय करता येईल यावर ही चर्चा केली जाईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमदारांचे शिवसेनेसोबत जाण्यास एकमत आहे. तसेच भाजप सत्ता स्थापन करण्यास अपयशी ठरल्यास राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण द्यावे असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेत सहभाग घेणार नाही तर एका जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असे शरद पवार म्हणाले होते. परंतु, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण पाठवल्यानंतर राजकीय समिकरण बदलले. भाजप बहुमताची चाचणी देत असताना भाजपच्या विरोधात मतदान करणार अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी मांडली. तर दुसरीकडे, काँग्रेसने राजस्थानमध्ये आपल्या आमदारांना नेऊन त्या ठिकाणी रविवारी बैठकही घेतली. त्यामध्येच शिवसेनेला पाठिंबा देताना सत्तेत सहभागी व्हायचे की सत्तेच्या बाहेर राहून बाहेरूनच पाठिंबा देत भाजपला दूर ठेवावे यावर चर्चा करण्यात आली.