सीतारामन कधी बारामतीचे ऑपरेशन करतील समजणारही नाही
पुणे-येत्या 2024 ला पवारांचे विसर्जन करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 3 दिवसीय बारामती दौऱ्यावर आहेत, असे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.जसे श्रीलंकेतील नेत्यांवर असलेल्या जनतेच्या रोषातून त्यांना देशातून पळून जावे लागले, तसेच पवारांना बारामतीमधून पळून जावे लागेल, असा हल्लाबोल पडळकर यांनी केला.
पडळकर म्हणाले की, बारामतीकरांना एखाद्याला फसवून, लुबाडून घेण्यात फार आनंद असतो. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा सुप्रिया सुळे वरमाई सारखं महाराष्ट्रभर फिरत होत्या.“केंद्राने लोकसभा प्रवास योजना जाहीर केली. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची नियुक्ती केली. त्या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. एकदा त्या बारामतीला आल्या तर पवारांना कळणार सुद्धा नाही आहे, भाजपाचा खासदार कसा दिल्लीला गेला. जेव्हापासून सीतारमण यांचा दौरा निश्चित झाला, तेव्हापासून सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. तुमच्या घराण्याने ५० वर्षे खूप सेवा केली. आता आराम करा,” असा टोला पडळकर यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.
पडळकर म्हणाले की, बारामती हा काही पवारांचा बालेकिल्ला नाही. ही केवळ एक टेकडी आहे. ती मी फिरून ठोकत आहे. मात्र, पोलिसांच्या सहाय्याने पवारांचे राजकारण सुरू आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असे म्हणत पडळकरांनी पवारांवर निशाणा साधला आहे.
बंद केले तेव्हा अजित पवारांच्या पाठीशी कुणीही उरले नव्हते , एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ५० आले
अजित पवारांनी बंड केले तेव्हा दोन तृतीयांश आमदार त्यांच्या मागे राहिले नाहीत. एकनाथ शिंदे 50 आमदार घेऊन गेले. फडणवीस यांना सत्तेत बसू द्यायचे नव्हते. तरीदेखील ते सत्तेत आले, हे शरद पवारांचे दुःख असल्याचे पडळकर यांनी म्हटले.
शरद पवारांना भारताने पाकिस्तान विरोधात मॅच जिंकल्यावर हात वर करावा लागतानाचा व्हिडिओ पोस्ट करावा लागतोय. तर कधी आरती करत असतानाचा हा खरा भाजपचा विजय असल्याची खोचक टीकाही पडळकरांनी पवारांवर केली. आजच्या मेळाव्यातील गर्दी पाहून पवारांना अस्वस्थ वाटू लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.