इथे कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरू असतात’; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
मुंबई- कोरोनाच्या नावानं पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज सभागृहातून महापौरांच्या अतिगोपनीय दालनात मुख्य सभा नेऊन पुण्याचे तीनतेरा वाजविणाऱ्या भाजपची डबल ढोलकी मुंबईत स्पष्ट झाली आहे . कोरोनाच्या नावानं राज्याचे अधिवेशन होणार का नाही, यावर प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे,’ असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, ‘हे सरकार कोरोनाच्या नावाखाली विरोधक आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे. कोरोनामुळे पूर्ण अधिवेशन घेता येत नसेल तर आता लेखानुदान घ्या आणि नंतर पूर्ण अधिवेशन घ्या. पण कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनासाठी तयार नाही. इथे कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरू असतात, तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का? नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का?’ असा सवालही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना केला.
फडणवीस पुढे म्हणाले की, ‘संजय राठोड प्रकरण असो की वीज कापण्याचे प्रकरण असो, विरोधी पक्ष नेहमी आक्रमक राहील. अशा प्रकरणात उघडे पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. जनतेच्या प्रश्नावर सरकारला काहीच देणेघेणे नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेणे म्हणजे स्वत:च्या आमदारांना आणि मंत्र्यांना घाबरले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीचा विषयच अजेंड्यावर आणला गेला नाही’, असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.