. पुणे- महापालिकेत 19 नगरसेवक बंडाच्या तयारीत असून महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र पसरली आहे. तसेच भाजपचे 19 नगर सेवक अजित पवारांच्या संपर्कात आल्याची चर्चा होत आहे.या संदर्भात भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले की भाजपामध्ये नगरसेवक नाराज असल्याची चर्चा फक्त काही विरोधकांमध्येच आहे. कोण पुड्या सोडत चुकीच्या बातम्या पसरवत आहे याची माहिती सर्वांना आहे, कोणीही भाजपा सोडून जाणार नाही.अश्या प्रकारच्या अफवा पसरवून भारतीय जनता पक्षात अस्थिरता निर्माण होणार नाही याची विरोधकांनी दखल घ्यावी.उलटपक्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणांमुळे आकृष्ट होवून आणि पुणे मनपा तील भाजपची उत्तम कामगिरी बघता येणाऱ्या काळात पुणेकर पुन्हा भाजप ला पसंती देतील हे लक्षात आल्यामुळे इतर पक्षातूनच भाजपामध्ये येण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची संख्या मोठी आहे असा दावा खर्डेकर यांनी केला आहे.मात्र आमचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार गिरीशभाऊ बापट हेच कोणाला प्रवेश द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेतील असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
गेल्या निवडणुकीत पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, मात्र भाजपाने ही सत्ता उलथवून लावत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला होता. पुणे महापालिका हातातून गेल्याची खंत अजित पवार अनेकदा बोलून दाखवतात.दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या चर्चांना अफवा असल्याचं सांगत खंडन केले आहे.पुणे शहरातील 19 नगरसेवक भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं होतं. भारतीय जनता पक्षाचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मोठी इनकमिंग भारतीय जनता पक्षात झाली होती. परंतु यातीलच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.