पुणे- पार्किंग पाॅलीसीवरून भाजपच्या काही स्थानिक आमदारांसह असंख्य नगरसेवकांमध्ये देखील असंतोष पसरला असून ही पाॅलीसी प्रत्यक्षात राबवायला सुरुवात केली तर पुढची निवडणूक आम्हाला कठीण जाईल असा रोष त्यांनी खाजगीत व्यक्त करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या महापालिका सभेत हि पाॅलीसी बहुमताने मंजूर केली तरी , ती राबविणे शक्य होणारे नाही असा दिलासा देत दुसरीकडे उद्याच्या सभेत उपस्थित राहून पार्किंग पाॅलीसी च्या बाजूने मतदान करण्याबाबत व्हीप बजावण्यात येत आहे .
पार्किंग बाबतचे झोन ठरविण्याचा अधिकार महापालिकेला नाही , ते पोलिसांना ठरवावे लागतील आणि असे झोन ठरविण्यासाठी सूचना हरकती आदी प्रोसिजरचा पोलिसांना सामना करावा लागेल .त्यामुळे गल्लीबोळात हे झोन ठरविणे मुश्कील आहे. या निमित्ताने एकच होईल कि वाहनतळे झपाट्याने उभारली जातील .विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका असे काही नेते या पाॅलीसी वर खुलासा करीत आहेत .
भाजप कडून निवडून आलेल्या आठ हि आमदारांना येत्या ८/९ महिन्यातच पुन्हा विधानसभा निवडणुकीचा सामना करायचा आहे . तर याबरोबर लोकसभा हि लागण्याची शक्यता आहे . अशा परिस्थितीत ही पाॅलीसी पुढे पुढे ढकलत राहावी तातडीने मंजूर करू नये अशी भाजपमधील सर्वाधिक लोकप्रतिनिधींची भावना आहे. मात्र अन्य मार्ग किंवा पर्याय नसल्याने पक्षाच्या आदेशापुढे मान तुकाविण्याची नामुष्कीजनक परिस्थिती त्यांच्यावर ओढविली आहे .
पार्किंग ची समस्या , वाढत्या वाहनांची संख्या , प्रदूषण अशी कारणे सत्य असली तरी ती अजगराप्रमाणे वाढत्या शहराला निश्चितच भेडसावतात . असे असताना वाढत्या शहराला मर्यादा घालणे हेच गरजेचे असताना , वारंवार शहरात अनेक गावे समाविष्ट करून शहराचा विस्तार आणखी वाढविला जातो आहे . पर्यायाने अजगरासारखे फुगणारे शहर , वाढती बेकायदा बांधकामे , वाढती खाजगी वाहने यांचा सामना करावा लागतो आहे . पे अँड पार्किंग करून लोकांच्या आर्थिक समस्येत भर टाकून भाजपा रोष ओढवून घेत आहे . असे म्हणणे मांडण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे . आणि अशी पाॅलीसी मंजूर केल्यास ते कॉंग्रेस राष्ट्रवादी सह सर्व विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडणार आहे म्हणूनच त्यांनी ही पाॅलीसी सातत्याने प्रलंबित ठेवली होती . त्यास बळी पडून पक्षाचे नुकसान होईल याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतो आहे .
या सर्व पार्श्वभूमीवर जर कोणी अन्य विरोधी पक्षांच्या एखाद्या नेत्याने यदाकदाचित ऑफर टाकली तर या पाॅलीसी वरून भाजपचे ३० हून अधिक नगरसेवक फुटू देखील शकतात आणि महापालिकेतील सत्तेला ग्रहण देखील लागू शकते याची ही चर्चा आज होत होती .
पार्किंग पाॅलीसीवरून भाजपच्या नगरसेवकांमध्ये असंतोष
Date: