पुणे-अर्ज माघारीचा आज, मंगळवारी अखेरचा दिवस असताना निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये ‘चकमक’ उडाली. बाचाबाचीनंतर धक्काबुक्की झाली. यावेळी दोघांच्याही कार्यकर्त्यांनी खुर्च्या फेकल्या. या प्रकारामुळे पुढील काळात महापालिका निवडणुकीची ‘दंगल’ आणखी जोरदार होण्याची चिन्हे आहेत.
अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच आज घोले रॉड क्षेत्रीय कार्यालयात उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी प्रभाग १६ (क)मधील काँग्रेसचे उमेदवार अस्लम बागवान हेही अर्ज मागे घेण्यासाठी आले होते. त्यावेळी रवींद्र धंगेकर आणि त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी भाजपचे त्या प्रभागातील उमेदवार गणेश बिडकर हेही कार्यालयात आले होते. त्यांनी बागवान यांना उमेदवारी मागे घेऊ नका, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर बिडकर आणि धंगेकर एकमेकांविरोधात भिडले. तर कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्या एकमेकांवर भिरकवल्या.
प्रभाग क्रमांक १६ क मधील काँग्रेसच्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळाला नव्हता. त्यामुळे तेथून अस्लम बागवान किंवा रवींद्र धंगेकर यांच्यापैकी एकाला माघार घेऊन दुसऱ्याला काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले जाणार होते. त्यामुळे दोघेही या कार्यालयात कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. त्याचवेळी एका महिला उमेदवाराच्या माघारीसाठी महापालिकेतील गटनेते आणि याच प्रभागातील भाजपचे उमेदवार गणेश बिडकर हेही तेथे आले. त्याचवेळी बिडकर यांनी बागवान यांना अर्ज मागे न घेण्यासाठी फूस लावली, असा आरोप धंगेकर यांनी केला. त्यावरून धंगेकर आणि बिडकर यांच्यात निवडणूक निर्णय आधिकाऱ्यांसमोरच बाचाबाची झाली. दोघांचेही समर्थक एकमेकांना भिडले. कार्यालयातील खुर्च्या एकमेकांवर भिरकावण्यात आल्या. शिवीगाळही झाली. त्यामुळे या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. यानंतर या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करून परिसर रिकामा करण्यात आला. परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते.
भाजपच्या उमेदवाराला अधिकृत उमेदवारी देताना जो न्याय लावला, त्याप्रमाणे मलाही काँग्रेसची अधिकृत उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली. या घटनेबाबत गणेश बिडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी माझ्या प्रभागातील महिला उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यासाठी आलो होतो. त्यावेळी धंगेकर यांनी मला शिवीगाळ करीत अंगावर धावून आले. धक्काबुक्की करण्यात आल्याचे बिडकर यांनी सांगितले. माझे कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते. बागवान अर्ज मागे घेण्यासाठी आले असता बिडकर यांनी त्यांना अडवले आणि काहींना फोन लावून दिला. ते मला समजले. त्यामुळे मी तत्काळ तेथे आलो. त्यावेळी आपल्या दोघांनाही निवडणूक लढायची आहे. तुम्ही असे का करता, असे मी विचारले. त्यामुळे वाद होऊन धक्काबुक्की झाली, असे धंगेकर यांनी सांगितले.