पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी सादर केलेला भाजपचा एबी फॉर्म निवडणूक आयोगाने अमान्य केल्यामुळे भोसले यांच्या भाजप उमेदवारीबाबतच्या नाट्याला आणखी एक कलाटणी मिळाली आहे.विशेष म्हणजे राष्ट्रवादीने , अजितदादांनी या बंडखोरीची गंभीर दाखल घेऊन इशारा दिल्यानंतर हि नाट्यमय घटना घडल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे .
पुणे महापालिकेच्या पुणे विद्यापीठ- वाकडेवाडी या प्रभाग क्र. सातमधून सर्वसाधारण जागेसाठी भाजपतर्फे सतीश बहिरट व रेश्मा भोसले या दोन उमेदवारांनी एबी फॉर्म सादर केले होते. एकाच जागेसाठी दोन एबी फॉर्म आल्याने निवडणूक आयोगाने ते अमान्य केले. त्यामुळे रेश्मा भोसले व बहिरट हे दोघेही आता अपक्ष उमेदवार ठरले आहेत. दोघांनाही आता भाजपचे कमळ हे निवडणूक चिन्ह मिळू शकणार नाही.
रेश्मा भोसले यांनी अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या नावाने भरला पण भाजपचा एबी फॉर्म जोडला. पक्षाने रेश्मा भोसले या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचे पत्र दिले. पण अर्ज चुकीचा ठरवल्याने त्या पक्षाच्या उमेदवार ठरू शकल्या नाहीत. तसेच सतीश बहिरट यांनाही पक्षाने एबी फ्रॉम दिला होता. मात, रेश्मा भोसले या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितल्याने त्यांचा एबी फॉर्म रद्द केला. त्यामुळे आता प्रभाग क्रमांक 7 अ मधून भाजपचा उमेदवार नाही.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रेशमा भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपकडून प्रभाग क्रमांक 7 ओपन गटामधून अर्ज दाखल केला होता.त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी खासदार संजय काकडे यांनी विशेष प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यांना अर्ज नाकारण्यात आल्यानंतर पुणे विद्यापीठ येथील अजित पवार यांच्या निवासस्थाना बाहेर अनिल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा बाजी देखील केली होती.
त्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात भाजप बळकट झाला आहे. अनिल भोसले हे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. त्यांच्या पत्नीच्या भाजप प्रवेशाने आगामी राजकीय वाटचालीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदा झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यामधून अनेक दिग्गज राष्ट्रवादीचे नेते इच्छुक होते. मात्र अजित पवार यांनी पुन्हा अनिल भोसले यांच्यावर विश्वास दाखवीत विधान परिषदेची उमेदवारी देत. त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणले.