पुणे, 29 जून: दुपारी दोन वाजल्यापासून पीएमपीएमएलच्या भाडेतत्वावरील 440 बसचालकांनी आज अचानक संपावर गेलेत.पीएमपीएलकडून करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईविरोधात चालकांनी हा संप पुकारल्याचं सांगितलं जातंय. पण या संपाला कंत्राटदारांचीही फूस असल्याचं बोललं जातंय.
आयुक्त तुकाराम मुंडेंनी वारंवार बंद पडणाऱ्या बसेसच्या घटना कमी करण्यासाठी कंत्राटदारांना 5 हजाराचा दंड आकारला होता. या कठोर कारवाईविरोधात कंत्राटदारांमध्ये असंतोष होता, म्हणूनच चालकांचं नाव पुढं करुन कंत्राटदारांनी हा संप केल्याची माहिती मिळते आहे .तुकाराम मुंढेंनी पीएमपीची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतल्यानंतर अनेक निर्णय घेतलेत. यात एखाद्या स्टॉपवर गाडी न थांबल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली. तसंच जर चालकाकडून एखादी चूक झाली किंवा त्याने सिग्नल तोडला तर त्याच्या पगारातून 100 रुपये दंड म्हणून घेतले जातात.तुकाराम मुंढेंचे निर्णय जाचक असल्याचं सांगत पीएमपीच्या कंत्राटी चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. पीएमपीएमएलची जीपीएस यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत नसल्याने चुकीची माहिती मिळते असं चालकांचं म्हणणं आहे. हा निर्णय मागे घेण्याची चालकांनी मागणी केली आहे. दरम्यान याप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे.
दरम्यान, शालेय बसदरवाढीवरून आणि मुंडेंच्या आत्मकेंद्रित वर्तणुकीवरून पालिकेचे पदाधिकारी संतापलेले आहेत अशातच आता कंत्राटदारांच्या बस चालकांनी संप पुकारला आहे .