पुणे- आज दिवसभरात पीएमपीएमएलच्या दोन बस आगीच्या भक्षस्थानी पडल्या . तर दुसरीकडे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करत कर्मचाऱ्यांवरील कारवाईचा बडगा सुरूच ठेवल्याचे वृत्त आहे . मात्र या बदल्या काल सायंकाळी करण्यात आल्या . या बदल्यांचा आणि 2 बसेसला लागलेल्या या आगीचा मात्र काहीही संबंध नाही… ..दरम्यान, पीएमपीएमपीएल बसला आग लागण्याच्या घटनात वाढ झाली असून मागील दहा दिवसातील ही चौथी घटना आहे. यापूर्वी दिवेघाटात आणि सिंहगडरोड येथे पीएमपीएमएल बसला आग लागली होती.
आरटीओ चौकात आज सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच सर्व प्रवाशांना सतर्क केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान एकाच दिवसात दोन पीएमपीएमएल बसला आग लागल्या.
अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशनवरून आकुर्डीच्या दिशेने 21 प्रवाशांना निघालेली ही बस आरटीओ चौकात येताच बसच्या समोरील भागातून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरवले आणि काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत बसचा काही भाग आगीत जळून नष्ट झाला होता.आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास चिंचवडगांवातील बसस्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बसने पेट घेतला होता. ही आग एवढी मोठी होती की धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. संत तुकारामनगर येथील अग्निशामन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु यामध्ये पीएमपीएमएल बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.