नवी दिल्ली-
केंद्र सरकारने जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र सम्मेद शिखर येथे सर्व पर्यटन आणि इको-टूरिझमवर बंदी घालण्याचे निर्देश जारी केले आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी ही माहिती दिली. याची अधिकृत माहिती यादव यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी दिल्लीत जैन समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर यादव म्हणाले – झारखंडमधील पारसनाथ पर्वतावर असलेले जैनांचे पवित्र तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरचे पावित्र्य जपण्याचे आवाहन करणाऱ्या जैन समाजातील लोकांची भेट घेतली. समेद शिखरसह जैन समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांना आश्वासन दिले.केंद्र सरकारच्या या आदेशाचा आदर राखून सोमवारी ९ जानेवारी रोजी पुण्यात निघणारा मूक मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
2019 मध्ये, केंद्र सरकारने सम्मेद शिखरला इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले. यानंतर झारखंड सरकारने जिल्हा प्रशासनाच्या शिफारशीवरून त्याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याचा ठराव जारी केला. गिरीडीह जिल्हा प्रशासनाने नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी 250 पानांचा मास्टर प्लॅनही तयार केला आहे.


पारसनाथ पर्वतावर या उपक्रमांवर बंदी घालण्यात येणार
- दारू, अंमली पदार्थ आणि इतर मादक पदार्थांची विक्री
- मोठ्या आवाजात संगीत किंवा लाऊडस्पीकर वाजवणे
- पाळीव प्राण्यांसह प्रवेश
- अनधिकृत कॅम्पिंग आणि ट्रेकिंग
- मांसाहारी पदार्थांची विक्री
- याशिवाय जलस्रोत, वनस्पती, खडक, गुहा आणि मंदिरे यांचे नुकसान करणाऱ्या अशा सर्व कामांवर बंदी घालण्यात येणार आहे.
झारखंडचा हिमालय मानल्या जाणार्या या ठिकाणी जैनांचे पवित्र तीर्थक्षेत्र शिखरजी स्थापित आहे. या पवित्र परिसरात जैन धर्मातील 24 पैकी 20 तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाला. भगवान पार्श्वनाथ, 23 वे तीर्थंकर यांनीदेखील येथे निर्वाण प्राप्त केले. पवित्र पर्वताच्या शिखरावर जाण्यासाठी भाविक पायी किंवा डोलीने जातात. जंगल आणि पर्वतांच्या दुर्गम वाटांमधून ते शिखरावर पोहोचण्यासाठी नऊ किलोमीटरचा प्रवास करतात.
या विषयावर सम्मेद शिखरावर विराजित मुनिश्री प्रमाण सागरजी म्हणाले की, सम्मेद शिखर हे इको-टूरिझम नसावे, ते इको-तीर्थ असावे. सरकारने संपूर्ण प्रदक्षिणा आणि त्याच्या 5 किलोमीटर परिघातील क्षेत्र हे पवित्र स्थान म्हणून घोषित करावे, जेणेकरून त्याचे पावित्र्य अबाधित राहील. पर्यटन स्थळ झाल्यानंतर येथे मांस-दारू आदींची विक्री होईल, अशी भीती जैन समाजाला आहे, हे समाजाच्या भावनेच्या -मान्यतेच्या विरुद्ध आहे.